- स्नेहा पावसकरठाणे : डॉ. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनने अंतराळात उपग्रह सोडले होते. या उपक्रमात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमधून डोंबिवलीकर १६ वर्षीय मुकुल वाणी हादेखील सहभागी होता. त्याच्या उपग्रह निर्मितीच्या सहभागाची नोंद घेत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस, एसिस्ट वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांनी मुकुल यास प्रमाणपत्र दिले आहे. मुकुल याला अंतराळ क्षेत्रात विविध संशोधन करण्याची आवड आहे आणि आका याच वर्ल्ड रेकॉर्डच्या धर्तीवर त्याला भविष्यात ‘इस्रो’मध्ये नोकरीच्या दृष्टीने आशा पल्लवित झाल्या आहेत.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन हाऊस ऑफ कलामच्या वतीने रामेश्वरम येथून अंतराळात छोटे-छोटे असे १०० उपग्रह सोडले गेले होते. या उपक्रमात देशभरातील काही निवडक विद्यार्थी सहभागी झाले होते. जानेवारी २०२१ मध्ये पुणे येथे एकदिवसीय कार्यशाळा झाली होती. यात दहादहांच्या गटाने मिळून छोटे-छोटे उपग्रह बनविले होते. सुमारे १०० उपग्रह एकाच वेळी अंतराळात सोडण्यात आले. कृषीविषयक शास्त्रीय अभ्यासक्रमांची माहिती, रेडिएशन, ग्लोबल वॉर्मिंग यांची माहिती या उपग्रहांद्वारे मिळाली. हे उपग्रह उड्डाणाची यशस्वी नोंद गिनिज बुकसह इतर चार वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविणाऱ्या संस्थांनी घेतली आहे. त्याच उपक्रमातील यशस्वी सहभागाचे प्रमाणपत्र या पाचही रेकॉर्ड संस्थांनी मुकुल वाणी याला दिले आहे. मी डोंबिवलीतील नारायणा कॉलेजमध्ये ११वी इयत्तेत शिकतो. मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या उपक्रमात सहभाग घेतला होता. मला या उपक्रमात आईवडील, कुटुंबीय आणि इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. भविष्यात मला अवकाश संशोधन क्षेत्रात करिअर करायचे आहे.- मुकुल वाणी, सहभागी यशस्वी विद्यार्थी
उपग्रहनिर्मिती करणाऱ्या मुकुल वाणीच्या पाठीवर विक्रमांच्या कौतुकाची थाप!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 9:48 AM