ठाणे : ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक व नेत्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीला नाराज असलेल्या नेत्यांनी व नगरसेवकांनीच दांडी मारली. हणमंत जगदाळे व त्यांच्या पॅनेलमधील तीन माजी नगरसेवक, मुंब्र्यातील राजन किणे, त्यांची पत्नी व भाऊ, राजू अन्सारी, जितू पाटील यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. नाराज नजीब मुल्ला हे बैठकीला हजर नव्हते. मात्र ते दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले होते.
ठाण्यात मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाणार, असे चित्र निर्माण झाले आहे. पक्ष सोडण्याकरिता आमिष दाखविले जात आहे. कोणीही कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, तुमची फसवणूक केली जाऊ शकते. पुन्हा चांगले दिवस येणार आहे, थोडे दिवस थांबा, पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाण्यातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना दिला. मात्र, नाराज मंडळी बैठकीला न आल्याने पवारांचा सल्ला वाया गेला.
१२ ते १६ माजी नगरसेवक फुटणार? राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्यांच्या पक्षातील काही माजी नगरसेवकांनी मुंब्रा विकास आघाडी स्थापन केली आहे. नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील प्रमुख पदाधिकारी हजर राहिले. लोकमान्यनगर भागातील हणमंत जगदाळे यांनी इतर तीन सहकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादीचे घड्याळ काढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीचे १२ ते १६ माजी नगरेसवक फुटणार अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पवार यांनी ठाण्यातील माजी नगरसेवकांची मुंबईत बैठक घेतली.