तलासरी/विक्रमगड : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कष्टकरी संघटना यांच्या वतीने शनिवारी दुपारी ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तलासरी, डहाणू, विक्रमगड तसेच इतर भागांत मार्ग रोखून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यात गंजाड येथे राज्य महामार्ग बंद पाडून कष्टकरी संघटनेने आंदोलन केले. तर तलासरी येथे माकपचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी माकपचे राज्य सचिव बारक्या मांगात, लक्षुमन डोंबरे, तलासरी पंचायत समितीचे सभापती नंदकुमार हडळ, तलासरीच्या नगराध्यक्ष स्मिता वळवी, नगरसेवक सुहास सुरती इत्यादी सहा शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी तसेच दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माकपतर्फे हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आल्या. मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी तलासरी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेला कृषी विधेयक कायदा रद्द करावा, या मागणीसाठी दोन महिन्यांपासून दिल्लीच्या हद्दीवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी व हे कृषी विधेयक रद्द करण्यासाठी विक्रमगड तालुक्यातील मार्क्सवाद कम्युनिस्ट पक्षातर्फे शनिवारी विक्रमगड शहरात चक्काजाम आंदोलन करून केंद्र सरकारच्या निषेध केला. यावेळी तालुका सचिव कॉ. किरण गहला, कॉ. चिंतू कानल, कॉ. अमृत भावर, कॉ. ताई बेंदर, कॉ. राजा गहला यांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखला; तलासरी, डहाणू, विक्रमगडमध्ये माकप, कष्टकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 1:36 AM