कल्याण : क्रांती दिनाचे औचित्य साधत गुरुवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली गेली आहे. मात्र, कल्याण डोंबिवलीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकारचा निषेध म्हणून धरणे आंदोलन छेडले जाणार आहे. शहरातील मराठा आंदोलकांतर्फे कोणत्याही प्रकारचा बंद होणार नाही असे दोन्ही शहरातील समन्वयकांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री मराठा समन्वयकांची बैठक पार पडली. त्यामध्ये धरणे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. कल्याणमध्ये पश्चिमेकडील तहसिल कार्यालयाच्या परिसरात तर डोंबिवलीत पुर्वेकडील इंदिरा गांधी चौकात हे धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तसेच मराठा समाजातील आंदोलकांवर सरकारने हे गुन्हे दाखल केले आहेत, त्याचा निषेध म्हणून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे समन्वयकांकडून सांगण्यात आले आहे. सरकारने गुन्हे दाखल करुन आंदोलकांचे भविष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केल्याकडे लक्ष वेधत हे धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 25 जुलैला मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शहर बंद आंदोलन छेडण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा शहर बंद करुन नागरीकांना वेठीस धरले जाणार नाही. पण, सरकारचा निषेध म्हणून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कल्याणमधील समन्वयक अरविंद मोरे आणि शाम आवारे यांनी दिली. तर गुरूवारी धरणे आंदोलन छेडले जाणार आहे पण नोव्हेंबरर्पयत आरक्षणाचा निर्णय न झाल्यास १ डिसेंबरपासून उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा डोंबिवलीमधील समन्वयक राजेश शिंदे, शैलेश चव्हाण, लक्ष्मण मिसाळ यांनी दिला आहे.