कल्याण : मुंबई- बडोदा महामार्गाच्या प्रकल्पात कल्याण तालुक्यातील 12 गावातील शेतकरी बाधित झाले आहेत. या बाधित शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाच्या धरर्तीवर मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी संघर्ष समितीच्यावतीने आज सोमवारी कल्याण तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. योग्य मोबदला दिल्याशिवाय महामार्गासाठी जमीन देणार नाही असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. मुंबई बडोदा महामार्ग संघर्ष समितीचे समन्वय चंद्रकांत भोईर यांनी सांगितले की, महामार्ग प्रकल्पात कल्याण तालुक्यातील 12 गावचे 806 पेक्षा जास्त शेतकरी बाधित होत आहे. या प्रकल्पात 162 हेक्टर जमीन बाधित होत आहे. सांगोडे, कोंडेरी, नांदप, मानिवली, वाहोली, पिंपपोळी, गोवेली, आपटी, बेहरे, मांजर्ली, उंभार्ली, रायते, बल्याणी ही गावे बाधित होत आहे. कल्याण तालुक्यातील प्रकल्प बाधितांसाठी सरकारने केवळ 6 कोटी 50 लाखाची तरतूद केली आहे. त्यापैकी एक कोटी 62 लाखाचा निधी सरकार दरबारी जमा करण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांना 12 लाख 50 हजार रुपये नुकसान भरपाई दिला जात आहे. तर काही शेतकऱ्यांना एक ते दीड लाख रुपये भरपाई दिली जात आहे. नुकसान भरपाई व जमिनीच्या मोबदल्यात तफावत आहे. कोणत्याही शेतकऱ्याला कमी जास्त मोबदला न देता एक सारखा व एकसमान मोबदला दिला जावा. किमान 12 लाख 50 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जावी. तर जमीन प्रकल्पासाठी दिली जाईल. शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळा नुकसान भरपाई दिला जात आहे. हा भेदभाव का ? असा सवाल समितीच्या वतीने उपस्थित केला आहे. प्रकल्पासाठी भूसंपादन 2013 पासून केले होते. सर्वेक्षण करण्यात येणा-या शेतक-यांना 24 ऑक्टोबरपासून मोबदला दिला जाणार आहे. मोबदल्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या प्रक्रियेस शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. 2013 सालच्या बाजारभाव मूल्याप्रमाणो मोबदला न देता चालू भावाप्रमाणो दिला जावा. 2013 सालच्या बाजारभाव मूल्यात व आजच्या मूल्यात दीड पटीची तफावत आहे. ही एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला आहे. 24 ऑक्टोबरच्या मोबदला वाटपावर स्थगिती देण्यात यावी अशी समितीची मागणी आहे. समितीने सुरु केलेल्या लाक्षणिक उपोषणाला भाजप आमदार किसन कथोरे यांनी भेट दिली. शेतक-यांच्या पाठिशी असल्या सांगून कथोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आहे. समितीने काल रविवारी बापसई गावात एका कार्यक्रमासाठी आलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या मागणीचे निवेदन सादर केले आहे. उपोषणास सर्व पक्षीय पदाधिका-यांनी पाठिंबा दिला आहे. उपोषणात मिनाक्षी जाधव, अंकूश पाटील, महेंद्र जाधव, अनंता जाधव, संतोष शिरोशी आदी सहभागी झाले होते.
मुंबई-बडोदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे उपोषण; योग्य मोबदल्या दिल्याशिवाय जमीन देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 2:40 PM