वाडा : उभी संसारे अन् पारंपारिक वहिवाटा गाडणारा मुंबई बडोदा व्हाया पनवेल महामार्गाला वाड्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. यात शेतकऱ्यांची जमिन, घरे जात असल्याने शेतकऱ्यांना उध्वस्त करून हा रस्ता होऊ देणार नाही असा, पवित्रा शेतकरी कल्याणकारी संघटनेने घेतला असून त्या विरोधाचे निवेदन वाड्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.मुंबई बडोदा व्हाया पनवेल हा महामार्ग तालुक्यातील केळठण, गोराड या ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जात असून सदरचा रस्ता हा १२० मीटर रूंदीचा असून त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत असणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना या रस्त्याचा उपयोग होणार नाही. निबंवली या गावातील ३० घरे, गोराड ४ घरे व केळठणमधील ६ घरे या रस्त्यात जाणार असून वरील शेतकरी हे बेघर होणार आहेत. तसेच शेतावर, बाजारहाट करण्यासाठी जाणारे मार्ग बंद होऊन लांब फेऱ्याने शेतकऱ्यांना जावे लागणार आहे. तसेच शेतकऱ्यांची शेती दोन भागात विभागली जाणार आहे. या रस्त्यात निबंवली गावातील दोन विहीरी, पाच कुपनलिका व दोन तलाव बाधीत होणार असल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. निबंवली येथे गरम पाण्याची कुंडे आहेत. तसेच रस्ता या कुंडावरून जात असल्याने गरम पाण्याची कुंडे रस्त्यात गाडली जाऊन पर्यावरणाला धोका निर्माण होईल अशी भीती शेतकऱ्यांनी निवेदनात व्यक्त केली आहे. मुंबई बडोदा व्हाया पनवेल हा महामार्ग आम्ही कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. यासाठी दोन हात करू असा गंभीर इशारा संघटनेचे अध्यक्ष कृष्णा भोईर यांनी दिला आहे. (वार्ताहर)
मुंबई-बडोदा व्हाया पनवेल मार्ग नकोच!
By admin | Published: April 29, 2017 1:21 AM