भाईंदर-
ती रेल्वे ब्रीजच्या काठावर बसली होती. बराचवेळ ती एकटीच बसून होती आणि सारखी खाली खाडीतील पाण्याकडे पाहात होती. खाडीत बोटीनं जाणाऱ्या मच्छिमारांना संशय आला म्हणून त्यांनी तिला आवाजही दिला. पण तिनं दुर्लक्ष केलं. मच्छिमारांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर संध्याकाळी चारच्या सुमारात चर्चगेट-विरार लोकल पुलावरुन जात होती आणि मोटरमननंही त्या मुलीला पाहिलं. मोटरमननंही तत्काळ पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली. पोलीस येईपर्यंत तीनं खाडीत उडी घेतली. ही घटना ठाणे जिल्ह्यातील भाईंदर आणि नायगाव रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या रेल्वे खाडीपुलावर घडली आहे.
नायगावजवळ खाडीपुलावरुन तिनं उडी घेताच खाली बोटीनं मच्छिमारीसाठी आलेल्या मच्छिमारांनी बुडणाऱ्या तरुणीला वाचवलं. तिला एका छोट्या बोटीनं किनाऱ्यावर आणलं आणि नजिकच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केलं. तिची प्रकृती आता स्थिर असून तिला वाचवण्यात यश आलं आहे.
आत्महत्या नव्हे, पाय घसरल्याचं दिलं कारणसंबंधित घटना शनिवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास घडली आहे. मुलगी नालासोपारा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तिचं वय १६ वर्ष असून आत्महत्येचा प्रयत्न का केला असं विचारलं असता तिनं पोलिसांना वेगळीच माहिती दिली. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत नव्हते. माझा पाय घसरुन मी पडले असं तिनं पोलीस चौकशी सांगितलं आहे. त्यामुळे पोलिसांना अद्याप नेमकं कारण कळू शकलेलं नाही.
नालासोपारा येथे राहत असतानाही ती नायगावच्या पुलाजवळ निर्मनुष्य ठिकाणी काय करत होती? तसंच अशा धोकादायक ठिकाणी बसण्यामागचं कारण काय? अशा अनेक प्रश्नांची तिनं उत्तरं दिलेली नाहीत. दरम्यान संपूर्ण घटना मच्छिमारांनी आपल्या मोबाइल कॅमेरामध्ये कैद केली आहे. वारंवार आवाज देऊनही तिनं प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मच्छिमारांनी पोलिसांना याची सूचना दिली. मुलीनं खाडीत उडी घेताच मच्छिमारांनी तातडीनं धाव तिला वाचवलं.