ठाणे : पुन्हा एकदा रस्त्यावर पडलेल्या चिखलाने ठाणे शहरातून जाणारा मुंबई नाशिक महामार्ग रोखून धरला होता. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कॅडबरी ब्रिज जवळ, विवियाना मॉलच्या समोर, मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या रोडवरती अनोळखी डंपरमधून चिखल पडल्यामुळे त्या रस्त्यावर सुमारे ४० मिनिट वाहतूक कोंडी झाली होती. त्याच्यावर वेळीच पाण्याचा मार केल्यानंतर तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार ए एस साबळे यांनी भ्रमण ध्वनीवरून आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मुंबई-नाशिक रोडवरील विवियाना मॉलच्या समोर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या रोडवरती एका अनोळखी डंपरमधून चिखल पडले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह व ०१-रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. चिखलावरून वाहन घसरण्याची शक्यता अधिक असल्याने त्या रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
मात्र याचदरम्यान सुदैवाने तोपर्यंत कोणालाही दुखापत झालेली नाही. त्यानंतर तातडीने मुंबई-नाशिक रोडवरती पडलेल्या चिखलावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांचे मदतीने पाणी मारून बाजूला करण्याचे काम सुरू झाले. चिखल पूर्णपणे बाजूला केल्यानंतर तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि वाहतूक पुर्वरत होण्यास सुरू झाली अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.