ठाणे - सध्या राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. त्याात मुंबई, ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत अन्न, नागरी पुरवठा विभागाअंतर्गत येणाऱ्य नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे आस्थापनेवरील शिधावाटप कर्मचारी, अधिकारी बदलापूर, कल्याण, विरार, पनवेल अशा अनेक दूरवरच्या ठिकाणावरून प्रवास करणारे चार हजार २२३ शिधावाटप दुकानांवरील एक हजार ५० अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या लसीकरणपासून वंचित असल्याचा आरोप मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामराजे भोसले व सरचिटणीस विनायक निकम यांनी केला आहे. कोरोनाच्या या महामारीत सातत्याने अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम मुंबई, ठाणे शिधावाटप विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरातील जनतेपर्यंत चार हजार २२३ शिधावाटप दुकानांमार्फत अन्नधान्याचा पुरवठा करीत आहेत. या यंत्रणेतील शिधावाटप अधिकारी, सहायक शिधावाटप अधिकारी, शिधावाटप निरीक्षक व कार्यालयीन कर्मचारी जनतेपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याचे काम चोखपणे बजावले आहे. या शहरांना कोरोना विषाणूचा विळखा पडलेला असताना शिधावाटप कर्मचारी, अधिकारी जीव मुठीत घेऊन जनतेपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याचे कर्तव्य प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहून पार पाडत आहेत.
शिधावाटप यंत्रणेतील यांनी संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात काम करणारे कर्मचारी, अधिकारी अद्याप लसिकरणापासून वंचित असल्याचे भोसले यांनी दिली. या शिधावाटप यंत्रणेत सहायक नियंत्रकशिधावाटपची सात पदे मंजूर असून ती गेल्या तीन वर्षापासून रिक्त आहेत, शिधावाटप अधिकारी हे कार्यालय प्रमुख पदांमधील ६० पदांपैकी २७ पदे रिक्त आहेत. तर सहायक शिधावाटप अधिकारी यांची १६ पदे रिक्त आहेत. शिधावाटप यंत्रणेचा कणा समजल्या जाणाऱ्या शिधावाटप निरीक्षक यांची २५३ इतकी पदे रिक्त आहेत व इतर कर्मचारी यांची ४४८ पदे रिक्त आहेत संपूर्ण शिधावाटप यंत्रणेत १८९० पदांपैकी ७५१ एव्हढी पदे रिक्त आहेत. शासनाकडे वारंवार पत्र व्यवहार करूनही अद्याप रिक्त पदेभरलेली नाहीत.
कोरोनाची गंभीर परीस्थिती असताना अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम देखील कर्मचारी/ अधिकारी यांच्या माथी मारली जात आहे. तूर्तास या अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविण्यात येऊ नये अशी मागणी संघटनेच्या वतीने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव यांच्याकडे केली आहे, असे मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामराजे भोसले व सरचिटणीस विनायक निकम यांनी सांगितले.