ठाणे - ठाणे जिल्ह्यात बुधवारी रात्रीही मुसळधार पाऊस सुरूच होता. मध्य रेल्वेच्या उंबरमाळी आणि कसारा स्थानकारदरम्यान, तसंच अंबरनाथ आणि वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं लोकल सेवा थांबवण्यात आली. तर, जिल्ह्यातील अनेक भागात पावसामुळे घराबाहेर पडणेही अवघड होऊन बसले होते. शहापूर तालुक्यातील परांजपेनगर भागात एक कुटुंब घरात अडकले होते. घराच्या चोहोबाजूंनी पाण्याने वेढल्याने ते कुटुंबा मदतीसाठी वाचवा... वाचवा... अशी साद घालत होते. त्यावेळी, शिवसेना नेते माजी आमदार पांडुरंग बोरकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने तेथे धाव घेतली.
परांजपेनगर चेरपोली हायवेलगतच्या मैदानावरील एका घरात 3 लहान मुले व त्यांचे आई वडील पाण्यात घर बुडाल्यामुळे अडकून पडले होते. याबाबत माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. आपल्या काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दोराच्या सहाय्याने त्यांनी या कुटुंबाला सुखरुपपणे बाहेर काढले. त्यामुळे, शिवसेना नेते पांडुरंग बरोरा यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होते आहे. याबाबत स्वत: बरोरा यांनीही फेसबुक पेजवरुन घटनेची माहिती दिली आहे. रात्रीचे १२ वाजले होते, पाऊस मुसळधार पडत होता, वीजही गेली होती. एवढा मोठा पाऊस मी यापूर्वीही कधी पाहिला नव्हता. मी रहात असलेल्या परांजपेनगर येथील माझ्या घराच्या बाजूचा नाला तुडुंब भरुन वाहत होता. तर, माझ्या घराच्या पायरीलाही पाणी लागले होते. त्यामुळे बाहेर आलो तर समोर वाचवा वाचवा असा आवाज येऊ लागला. त्यावेळी, समोरच्या मोकळ्या मैदानात असलेल्या घराला पाण्याने वेढा मारला होता. समोरच्या घरातून इशारा करण्यासाठी बॅटरी मारत होते. तात्काळ पोलिस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यांना याबाबत कळविले. परंतु, त्या घरात पाणी वाढत असल्याने सातत्याने वाचविण्यासाठी टाहो फोडत होते. रवि मडके त्यांचे काही सहकारी आले, त्यांना सोबत घेऊन दोराच्या सहाय्याने त्या घरातील पती पत्नी व 3 लहान बालके यांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले, अशी माहिती पांडुरंग बरोरा यांनी दिली आहे.
लोकल वाहतुकीला पावसाचा फटका
मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा या दोन्ही मार्गावरील वाहतुकीला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. कसारा परिसरात केवळ ४ तासांमध्ये १३९ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे उंबरमाळी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी साचल्याचं दिसून आलं आहे. याशिवाय कसारा येथेही ट्रॅकवर पाणी साचलं असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, बुधवारी रात्री सव्वादहा वाजल्यापासून इगतपुरी ते खर्डीदरम्यानची वाहतूकही थांबवण्यात आली असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मुंबईतही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूककोंडी झाली होती.