शहापूर : कामगारांच्या मागण्यांची ना दखल घेतली जाते ना कामगार संघटनांशी चर्चा केली जाते. उलट कामगार हिताचे असलेले तुटपुंजे कायदे मोडीत काढत कामगारांना देशोधडीला लावले जात आहे. कामगार वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मंगळवारी भारतीय ट्रेड युनियनतर्फे शहापुरात रास्ता रोको करण्यात आला.
रस्ता रोको करण्यापूर्वी सीटूचे शहापूर तालुकाध्यक्ष कॉम्रेड विजय विशे, सरचिटणीस प्रशांत महाजन, राज्य सदस्य संतोष काकडे, कार्याध्यक्ष अशोक विशे, संजय हरड, मनीषा फोडसे, दिलीप कराळे, शैलेश फर्ड, हरिश्चंद्र जाधव, रघुनाथ तारमळे आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यामुळे मुंबई - शहाूपर - नाशिक महामार्ग काही काळ ठप्प होऊन होऊन दोन्ही बाजूकडील वाहतुकीची कोंडी झाली होती.
स्थानिक भूमीपुत्रांच्या मागण्या मान्य करून कामगारांना त्वरित कामावर घ्या. बंद कारखाने सुरू करण्यासाठी मालकवर्गाला त्वरित पाचारण करा, खाजगी पॅथॅलॉजी केंद्राच्या कायदेशीर बाबी तपासून गोरगरिबांची होणारी फसवणूक थांबवा, शहापूर, भिवंडी, आणि मुरबाड येथे कामगार हॉस्पिटलची निर्मिती करा, पुणधे, आटगाव, लाहे येथील औद्योगिक क्षेत्रात रस्ते आणि वीजेची सोय करा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण, रोजगार निर्मितीवर ठोस उपाययोजना करा, किमान वेतन कामाची हमी द्या, राज्य तसेच केंद्रातील २४ लाख रिक्त पदे तात्काळ भरा, कामगार कायद्याची अंमलबजावणी करा, कामगार कायद्यातील मालकधार्जिणे बदल मागे घेऊन सर्व कामगारांन सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा लागू करा, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांच्याकडे देण्यात आले.अनेक कामगार लाल झेंडे हातात घेऊन या लढ्यात सहभागी झाले होते. तसेच अंगणवाडी सेविकासुद्धा मोठ्या प्रमाणात आपली लहान मुले घेऊन रस्त्यावरच्या लढाईत सहभागी झाल्या होत्या.
महामार्ग अडवत अध्यक्ष कॉ. विजय विशे यांनी मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरूच ठेवणार असा आक्रमक पवित्रा घेतला, तसेच केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, तर पुढील आंदोलन अधिक आक्रमक करणार, असेही ते म्हणाले. दरम्यान, पोलिसांनी तसेच वाहतूक विभागाने यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. शहापूरचे डी.वाय.एसपी सावंत आणि शहापूर पोलीस अधीक्षक स्वत: या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लक्ष ठेवून होते.