- अनिकेत घमंडी
डोंबिवली - रेल्वे प्रवासात घाईगडबडीत गर्दीत गाडीत प्रवेश मिळवण्याच्या प्रवाशांच्या गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेत महागडे मोबाइल, सोन्याच्या चैन लांबवण्याच्या घटना रेल्वे स्थानकात नेहमी घडतात, अशाच एका घटनेत ठाणे रेल्वे स्थानकात एका चोराला रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने रंगेहात पकडल्याची घटना मंगळवारी घडली.
याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी बुधवारी माहिती दिली, ते म्हणाले की, ऋषिकेश ईश्वर धनगर रा. पांडे चाळ रूम नंबर ०३ सरकार नगर शिवनगरी संकुल बिल्डिंग जवळ अंबीवली या प्रवाशाने दिलेल्या तक्रारीवरून त्या पथकाने मोबाइल चोरताना सेवक विठ्ठल गायकवाड(२१) रा.संजय नगर झोपडपट्टी मज्जिड जवळ, वंदना टॉकीजच्या मागे, अंबरनाथ (पश्चिम) यास पकडले. रेल्वे अधिकाऱयांनी सांगितले की, गायकवाड हा ठाणे स्थानकात फलाट ५ वर संशयितपणे हालचाल करत होता, त्यावेळी कल्याण दिशेकडे जणाऱ्या लोकलच्या मोटरमन दिशेकडील पुढच्या लगेजमध्ये गर्दीत चढणाऱ्या प्रवाशाचा मोबाइल चोरताना त्या विशेष मोहिमेवर असलेल्या पथकाला आढळला. त्यांनी त्यास पकडले आणि तक्रारदाराकडून मोबाइलचे वर्णन जाणून घेतले, त्यानूसार गायकवाड याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे त्या वर्णनाचा मोबाइल आढळून आला. त्यावरून ठाणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यास अटक केल्याची माहिती देण्यात आली. ही कारवाई विशेष पोलीस पथकाचे नीलकंठ गोरे, पवन सिंह, विवेक यादव, दलीप यादव, गोविंद राम यांच्या चमूने केली.