डोंबिवली - मध्य रेल्वेला वीज पुरवठा करणाऱ्या टाटाच्या वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याची घटना बुधवारी (10 जुलै) सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी घडली. त्या घटनेमुळे कल्याण ते कर्जत, लोणावळा, आणि कल्याण ते कसारा, इगतपुरी दिशेकडील उपनगरीय आणि लांबपल्याच्या रेल्वे वाहतुकीला खीळ बसला. त्यामुळे ओव्हरहेड वायरमध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे गाड्या खोळंबल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
टाटा कंपनीकडून वीज पुरवठा करणाऱ्या नेतीवली टेकडी जवळच्या मुख्य विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने ही समस्या उद्भवल्याची माहिती वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. ए.के.सिंग यांनी दिली आहे. नेमका बिघाड काय झाला होता हे मात्र ते सांगू शकले नाहीत. त्या संदर्भात वरिष्ठांनी टाटा वीज वितरण विभागाच्या वरिष्ठांशी संपर्क साधला असून लवकरच वाहतूक सुरू होईल असे ते म्हणाले.
या घोळामुळे सकाळच्या वेळेतील चाकरमान्यांची गर्दी जरी विविध स्थानकांमधून काही प्रमाणात कमी झाली होती, तरी दुपारच्या सत्रातील शाळांना जाणारे विद्यार्थी आणि सकाळचे सत्र संपल्यावर घरी जाणाऱ्या महावद्यालयीन विद्यार्थ्यांना त्या घोळाचा फटका बसला. त्यामुळे डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, टिटवाळा, आसनगाव, बदलापूर कर्जत आदी स्थानकांमध्ये काही प्रमाणात विद्यार्थी ताटकळले होते. यासंदर्भात कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सांगितले की, तो बिघाड झाला होता, त्यानंतर साधारण अर्धा तासाने वीज पुरवठा सकाळी 9.30 च्या सुमारास पूर्ववत झाला. परंतू त्यामुळे लोकल वाहतुकीचे कल्याण पुढे कर्जत, कसारा दिशेकडील वेळापत्रक सपशेल कोलमडले. या घटनेनंतर त्या दिशेकडील अप डाऊन दोन्ही दिशांच्या लोकल 20 मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल सेवेवरही परिणाम झाला होता.
ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुधवारी (10 जुलै) सकाळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. हार्बर रेल्वेवरील कॉटन ग्रीन स्टेशन-शिवडी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिराने सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी कॉटन ग्रीन स्टेशन-शिवडी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे हार्बर रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली असून अनेक लोकल खोळंबल्या आहेत. मध्य रेल्वेच्या गाड्या 20 ते 25 मिनिटे उशीराने धावत आहेत. कल्याण, डोंबिवलीहून दररोज हजारो प्रवासी सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करतात. आज जवळपास 20 मिनिटे लोकल उशिराने सुरू असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.