ठाणे - ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगळवारी (6 ऑगस्ट) सकाळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. आसनगाव-कसारा लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेच्या खडवली व वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान कसाऱ्याकडे जाणाऱ्या रूळावर मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने आसनगाव-कसारा लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे वाहतूक अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू आहे. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे अनेक गाड्या डोंबिवली, कल्याण आणि टिटवाळा स्थानकात रद्द करण्यात आल्या आहेत. मालगाडीच्या मागे एक एक्स्प्रेस रखडल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे कर्जतहून नेरळला येणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. प्रवाशांना नेरळ स्थानकात उतरवून दुसऱ्या लोकलने पाठवण्यात आले आहे. तसेच ती लोकल कारशेडमध्ये पाठवण्यात आली आहे.
हार्बर मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक उशिराने सुरू आहे. दोन दिवसांपासून ठप्प असणारी बदलापूर-कर्जत लोकल सेवा पुन्हा पूर्वपदावर आली आहे. मुसळधार पावसाने मुंबईसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याला झोडपून काढले. यामुळे रेल्वे वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. सोमवारी काही प्रमाणात ही रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली असतानाच, मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास खडवली आणि वाशिंद रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने चाकरमान्यांना आजही लेट मार्क लागणार आहे. या रेल्वे वाहतुकीचा फटका शालेय विद्यार्थी, दूध व भाजीविक्रेते यांनाही बसणार आहे. मध्य रेल्वेचीमुंबई व कसाराच्या दिशेने धावणारी रेल्वे वाहतूक अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहे.
मध्य रेल्वेच्या गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. कल्याण, डोंबिवलीहून दररोज हजारो प्रवासी सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करतात. आज जवळपास 20 मिनिटे लोकल उशिराने सुरू असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच मध्य रेल्वेवर या बिघाडासंदर्भात रेल्वे स्थानकात उद्घोषणा करुन प्रवाशांना सूचित केले जात आहे. रविवारी मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला होता. कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली होती. तसेच पावसामुळे कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली. मध्य रेल्वेवरील सायन, कुर्ला रेल्वे स्थानक तसेच हार्बर मार्गावरील कुर्ला-वडाळा स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले होते.