ठाणे - मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी (4 जुलै) विस्कळीत झाली आहे. कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे. कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून महिला, विद्यार्थी एकातासापेक्षा अधिक वेळ झाला असला तरी स्थानकात अडकून पडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्रनगर एलटीटी एक्स्प्रेसचे इंजिन ठाकुर्ली दरम्यान बंद पडले असून ब्रेक जॅम झाले आहेत. त्यामुळे जलद अपची वाहतूक धीम्या अपवर वळवण्यात आली आहे. 10 वाजून 50 मि. ही घटना घडली असून त्या गाडी मागे दोन लोकल रखडल्या होत्या. त्यातील प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून चालत ठाकुर्ली स्थानक गाठले. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे.
मध्य रेल्वेने बुधवारी (3 जुलै) रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे कमी लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला होता. कामकाजाचा दिवस असल्याने व लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार धावत असल्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती. प्रवाशांची जादा गर्दी कमी लोकल फेऱ्यांमध्ये सामावू शकत नसल्याने प्रवाशांचे हाल झाले. मात्र त्यानंतर रविवारचे वेळापत्रक रद्द करण्यात आले.
ठाणे स्थानकात गर्दीमुळे तरुणी गुदमरली; तीन पुरुषही जखमी, मात्र नोंद नाही
बुधवारी ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे मुंब्य्राहून आलेल्या तरुणीला ठाण्यात उतरताच गुदमरून चक्कर आली. तिला आरपीएफ जवानांनी प्रथमोपचार केंद्रात नेले. तेथे उपचार करून तिच्या पालकांबरोबर तिला घरी पाठविण्यात आले. तर, मुंब्रा स्थानकात नाजमीन मोहम्मद इब्राहिम शेख (36) ही महिला लोकलमधून पडून जखमी झाल्याची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे. तसेच अन्य तिघे जखमी झाले; मात्र त्यांची नोंद नसल्याचे लोहमार्ग आणि आरपीएफ पोलिसांनी सांगितले. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या स्थानकांत येणाऱ्या गाड्या बुधवारी जवळपास अर्धा तास उशिराने येत होत्या. मुंब्रा-कळवा रेल्वे स्थानकांदरम्यान गर्दीमुळे चार प्रवासी पडून जखमी झाले. यामध्ये जखमी झालेल्या मुंब्य्रातील नाजमीन शेख यांच्या कंबरेला, हातपाय आणि मानेला दुखापत झाली. त्यांना ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. तर, नाजीर शेख हा तरुण गर्दीमुळे धावत्या लोकलमधून रुळांवर पडून त्याच्या पायाला दुखापत झाली.
निखिलेश कुबल हा तरुणही मुंब्रा-कळवादरम्यान पडला असून त्याच्या डोक्याला मार लागला. तर अन्य एका जखमी तरुणाचे नाव समजू शकले नाही. त्यांच्यावर उपचार करून घरी पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाण्यातील फलाट क्रमांक-4 आणि 6 वरील प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरपीएफ, जीआरपीएफ, होमगार्ड जवान तैनात करण्यात आले होते.
नऊ विशेष गाड्या सीएसएमटीला रवाना
ठाण्यातून मुंबईकडे जाण्यासाठी गर्दी झाल्याने ठाणे रेल्वे प्रशासनाने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ठाणे-सीएसएमटी सात आणि ठाणे-घाटकोपर दोन अशा नऊ विशेष गाड्या रवाना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारचे वेळापत्रक लागू केल्याने ठाण्यात 10 ते 15 गाड्या रद्द झाल्याची माहिती ठाणे रेल्वे प्रशासनाने दिली.