जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या सचिन प्रभाकर जाधव (२१, रा. संत ज्ञानेश्वरनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या गुंडाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने साेमवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सचिन याच्याविरुद्ध हाणामारीसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाण्याचे तत्कालीन पोलिस उपायुक्त विनय राठोड यांनी १२ ऑक्टोबर २०२१ रोजी दोन वर्षांकरिता ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि नवी मुंबई परिसरातून त्याला हद्दपार करण्याचे आदेश दिले हाेते. तरीही ताे वागळे इस्टेट परिसरात पुन्हा फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घाेडके यांना मिळाली. त्याच आधारे घाेडके यांच्या पथकाने १७ जुलै राेजी त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.