लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : चेंबूरच्या लालडोंगर भागात राहणाऱ्या बाबूराव प्रल्हाद सावंत (३०) या तरुणाने ठाण्यातील मासुंदा तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नसल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.एक अनोळखी मृतदेह गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळ मासुंदा तलावात तरंगत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना ७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्याचआधारे ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक संगम पाटील यांच्या पथकाने हा मृतदेह सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास तलावातून बाहेर काढला. तलावाच्या कठड्याजवळच मिळालेल्या एका बॅगेतील आधारकार्ड तसेच दोन मोबाइलही पोलिसांना मिळाले. यातील एका मोबाइलवर त्याच्या भावाचे अनेक मिस कॉल आल्याचे आढळले. संबंधित क्रमांकावर फोन केल्यानंतर तसेच आधारकार्डच्या आधारे तो मृतदेह बाबूराव याचा असल्याची माहिती मिळाली. चेंबूरच्या भीमवाडीत राहणारा त्याचा भाऊ आणि वडील हे दोघेही रिक्षाचालक आहेत. तर तो मुंबईतील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणेच तो कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर रात्री ९ वाजता तो घरी परतलाच नाही. अविवाहित असलेल्या बाबूरावला त्याचा भाऊ गुरुवार रात्रीपासून वारंवार फोन करीत होता. शुक्रवारी सकाळी थेट ठाण्यातील नौपाडा पोलिसांकडूनच या फोनवर त्याच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्याचे दोन मोबाइल आणि बॅग तसेच मृतदेह पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
मुंबईतील तरुणाची ठाण्यातील तलावात आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 11:57 PM
चेंबूरच्या लालडोंगर भागात राहणाऱ्या बाबूराव प्रल्हाद सावंत (३०) या तरुणाने ठाण्यातील मासुंदा तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली.
ठळक मुद्देमासुंदा तलावात मिळाला मृतदेह मोबाइलमुळे पटली ओळख