ठाणे-वासिंद : मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यातील तानसा धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे, तर भातसा, बारवी, आंध्रा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अपर वैतरणा आदी धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.
सर्वांत मोठ्या भातसा धरणाची सध्याची पाणी पातळी १२४.२८ मीटर असून ५२६.८० दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी साठा आहे. या धरणात आज रोजी तब्बल ५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. मोडकसागर धरणाची पाणी पातळी १५९.६९ मीटर झाली असून, या धरणात ७८.२६ टक्के पाणीसाठा झाला आहे, तर बारवी धरणाची सध्याची पाणी पातळी ६८.५२ मीटर झाली आहे. या धरणात ६८.२४ टक्के पाणीसाठा आहे.
तानसा धरणात आज १२९.५१ (८९.२७ टक्के) दलघमी साठा तयार झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जाेर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या या धरणाची पाणी पातळी १२७.८१ मीटर झाली आहे.
भातसा धरणात ५५.९१ टक्केच पाणी
शहापूर तालुक्यातील मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरण परिसरात हवा तसा पाऊस झालेला नाही. धरणाची भरून वाहण्याची पातळी १४२ मीटर आहे. सद्य:स्थितीत पाणीपातळी १२४.२८ म्हणजेच ५५.९१ टक्के आहे.
गावांना सतर्कतेचा इशारा
तानसा धरण भरून वाहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे धरणाखालील व नदीकाठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडीहून जास्त झाली आहे. पाण्याचा विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. महसूल व पोलिस प्रशासनानेही दक्ष राहावे, अशा सूचना दिल्या आहेत.