लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : उन्हाचा कडाका वाढू लागला असतानाच शहरात विजेचा लपंडावदेखील सुरू झाला आहे. ऐन गर्मीत वीज जाण्याचे प्रमाण वाढले असल्याने ठाणेकर हैराण झाले आहेत. विशेषकरून ठाण्याच्या पलीकडे कळवा, मुंब्रा आणि दिवा पट्ट्यामध्ये अघोषित भारनियमन सुरू झाले असून ज्या ठिकाणी महावितरणची मोठी थकबाकी आहे, अशा भागात वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, केवळ कळवा, मुंब्राच नव्हे तर नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या घोडबंदर पट्ट्यातील उच्चभ्रू वस्तीमध्येदेखील विजेचा लपंडाव सुरू असून महावितरणने मात्र मागणी वाढल्याने तांत्रिक स्वरूपाचे लोडशेडिंग असल्याचे स्पष्ट केले आहे. उन्हाच्या चढत्या पाऱ्याने नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे ठाणेकरांना अघोषित लोडशेडिंगला सामोरे जावे लागत आहे. महावितरणने कोणत्याही स्वरूपाची औपचारिक लोडशेडिंगची घोषणा केलेली नाही. मात्र, ठाण्यात अनेक ठिकाणी वीज जाण्याचे प्रमाण गेल्या ५ ते ६ दिवसांत अचानक वाढले आहे. विशेषकरून कळवा, मुंब्रा, दिवा आणि जुने ठाणे अशा ठिकाणी अचानकपणे खंडित होणाऱ्या वीजप्रवाहामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. ठाणे सर्कलअंतर्गत ठाणे १, २, ३, वागळे, भांडुप आणि मुलुंड असे सहा भाग येतात. सध्या उन्हाळ्यामध्ये ६१० मेगावॅट विजेची मागणी असून ती पुरवण्यात येत असल्याचा दावा महावितरणने केला आहे. मात्र, ती पुरेशी नसल्याचेच वीज जाण्याच्या प्रमाणावरून स्पष्ट होत आहे. तांत्रिक बिघाडामुळे ऐन उन्हाळ्यात कळवा-खारेगाववासीयांना गुरु वारी तब्बल आठ तास विजेविना राहावे लागले. सकाळपासून दिवसभर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. कळवा-मुंब्य्राची थकबाकी १५० कोटीथकबाकीदारांसाठी महावितरणच्या वतीने नवप्रकाश योजना सुरू केली होती. संपूर्ण ठाणे सर्कलमध्ये ३०० कोटींची थकबाकी असून एकट्या कळवा-मुंब्य्राची थकबाकी १५० कोटींच्या घरात आहे. ही योजना जाहीर झाल्यापासून गेल्या सहा महिन्यांत केवळ १ ते २ कोटींचीच वसुली झाली आहे. विशेषकरून याच परिसरात वीज जाण्याचे प्रमाण जास्त आहे. येथे थकबाकी असली, तरी यामध्ये वीज जाण्याचा काहीही संबंध नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. लोडशेडिंग केलेले नाही. काही परिसर वगळता महावितरणची वसुली चांगली असून अशा ग्राहकांना नियमित वीजपुरवठा करणे वितरणचे कर्तव्य आहे. काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याने वीज जात आहे.
मुंब्रा आणि दिव्याला सर्वाधिक फटका
By admin | Published: May 06, 2017 5:57 AM