नवी मुंबई - मुंब्रा बायपास मार्ग दुरुस्तीसाठी पुढील दोन महिने बंद असल्याने या मार्गावरील वाहतूक मुलुंड-ऐरोली मार्गे ठाणे-बेलापूर मार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर मंगळवारपासून वाहनांची मोठी कोंडी होत आहे. याचा फटका शहराअंतर्गत वाहतुकीलाही बसला आहे. ही परिस्थिती पुढील दोन महिने कायम राहणार असल्याने वाहतूक पोलिसांची तारांबळ उडणार आहे.मुंबई, गोवा, बंगळुरूकडे जाणारी हजारो अवजड वाहने ठाणे-बेलापूर मार्गावर वळविण्यात आली आहेत. त्यामुळे सकाळपासून या मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. विशेषत: एमआयडीसीत जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला आहे.बुधवारी सकाळपासून या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे या उपनगरातील रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूककोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना अपुºया ठरल्याचे दोन दिवसांतील परिस्थितीवरून स्पष्ट झाले आहे. तसेच एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूककोंडीची झळ पोहचल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी एनएमएमटीच्या बसेसचा खोळंबा झाला. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसीसह शहरातील प्रमुख रस्ते वाहतूककोंडीने प्रभावित झाल्याचे दिसून आले.
मुंब्रा बायपास बंद: ठाणे-बेलापूर मार्गावर चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 6:50 AM