पुला वरील खड्ड्याचे काम अपूर्णच
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंब्रा बायपास पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा पूल गेले अनेक दिवस बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काम हाती घेतल्यानंतर ते वेळेत पूर्ण न झाल्याने हा पूल अवजड वाहनांसाठी आणखी दोन दिवस (१६ ऑगस्टपर्यंत) बंद असणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
मुंब्रा बायपासवर अनेक खड्डे पडले होते, तरी वाहतूक सुरू होती. मात्र, एक मोठा आरपार खड्डा पडल्यानंतर वाहतूक शाखेला जाग आली आणि पुलावरील वाहतूक बंद करून पीडब्ल्यूडीने दुरुस्ती सुरू केली. हे काम ९ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, काम वेळेत पूर्ण न झाल्याने हा पूल आणखी चार दिवस बंद ठेवण्यात आला होता. पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने पूल अवजड वाहनांसाठी आणखी दोन दिवस बंद ठेवण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली .
प्रवेश बंद - तळोजा, पनवेल, महापेकडून मुंब्रा बायपास मार्गे जाणाऱ्या जड, अवजड वाहनांसाठी शीळ फाटा येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग - तळोजा, पनवेल, महापेकडून मुंब्रा बायपासकडे येणारी जड, अवजड वाहने महापे मार्गे कोपरखैरणे पुलाखालून राबळे-ऐरोली- अंदनगर चेक नाका मार्गे पुढे जातील.
वाहतुकीस मुभा - कल्याण, डोंबिवली, पनवेल, महापेकडून मुंब्रा बायपास मार्गे हलकी चारचाकी वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने रेतीबंदर रेल्वे पूलकडून खरेगाव टोलनाका मार्गे जातील.
..........