ठाणे - ठाण्यातील वाहतूक कोंडी संपवण्यासाठी गणेशोत्सवाआधी मुंब्रा बायपास सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मुंब्रा बायपासची पाहणी करून आज सकाळी ते उद्घाटन करणार होते. पण काही अपरिहार्य कारणांमुळे ते येऊ शकले नाही. मात्र त्यांच्या ऐवजी बांधकाम राज्यमंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उद्घाटन करण्याचे घोषित केले. याची चाहूल लागताच शिंदे यांच्या आधी रविवारी रात्री बारा वाजत मुंब्रा बायपासचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून उद्घाटन करण्यात आले.
सोमवारी सकाळी गेल्या चार महिन्यांपासून संथ गतीने दुरुस्ती सुरु असलेल्या या बायपासचे काम आज पूर्ण झाल्याचे घोषित करत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आणि तो सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला. मात्र आव्हाड यांनी रात्री उद्घाटन केल्याच्या विषयावर बोलताना शिंदे म्हणाले की जितेंद्र आव्हाडांना श्रेय घेण्याची आणि स्टंट करण्याची सवय आहे. नगरसेवकांनी केलेल्या कामाचे देखील ते श्रेय घेतात असा टोला एकनाथ शिंदे यांनी या उद्घाटनप्रसंगी आव्हाड यांना लगावला.