- पंकज रोडेकरठाणे - ठाणे आणि पालघर जिल्हा प्रशासनाने अधिसूचना काढल्यानंतर आता ठाणे शहर आणि नवी मुंबई पोलिसांच्या पुनर्अधिसूचनेच्या प्रतीक्षेत मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम आणखी एक दिवस पुढे गेले आहे.वाहतूक शाखेकडून ८ मेपासून बायपासवरील वाहतूक बंद केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे शक्य नाही. पहिल्या टप्प्यात मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीत रेल्वेच्या उड्डाणपुलाचे बांधकाम, बेअरिंग मजबूत करणे आणि बदलणे, काही डेस्कलॅब तोडून नवीन बांधणे हे काम करून आपत्तीची परिस्थिती ओढवल्यास त्या कालावधीत वाहतूक यामार्गे कशी सुरू करता येईल, त्यानुसार महत्त्वाची कामे सुरुवातीला हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग सूत्रांनी दिली. सुरुवातीला पालघर आणि ५ मे रोजी ठाणे जिल्हा प्रशासनाने अधिसूचना काढून ७ मेपासून मुंब्रा-कौसा बाह्यवळण रस्ता वाहतुकीस बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या अधिसूचना काढण्यासाठी जवळपास १३ दिवस हे काम लांबणीवर पडले. त्यातच आता वाहतूक शाखेच्या अधिसूचनेसाठी आणखी एक दिवस हे काम लांबणीवर पडले.‘या दुरुस्तीच्या कामासाठी पुनर्अधिसूचना काढण्यात येणार आहे. मात्र, त्यावर पोलीस आयुक्तांची स्वाक्षरी झाल्यानंतर ही वाहतूक थांबवण्यात येईल. ती अधिसूचना कोणत्याही क्षणी निघेल. त्यामुळे सोमवारी नाहीतर मंगळवारपासून वाहतूक बंद केली जाईल. तसेच काही दिशादर्शक फलक लावण्याचे बाकी आहेत. ती कामे हाती घेतली आहेत.’’- अमित काळे, उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा‘दुरुस्तीचे संपूर्ण काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणारे नाही. पण, आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास वाहतूक यामार्गे कशी सुरू करता येईल, त्या दृष्टीने महत्त्वाची कामे हाती घेतली जाणार आहेत. जोपर्यंत वाहतूक बंद होत नाही, तोपर्यंत काम सुरूही करता येणार नाही. वाहतूक बंद झाल्यावर कामे तत्काळ हाती घेतली जातील.’’- आशा जठाल, इंजिनीअर, सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेलसुरुवातीला करण्यात येणारी कामेवाहतूक बंद झाल्यावर रेल्वे ब्रिजवरील डेस्कलॅब, बेअरिंग मजबूत करण्याबरोबर बदलणे, दुभाजक, रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि कोसळणारी दरड कशी रोखता येईल, ही कामे प्राधान्याने केली जाणार आहेत.
मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम एक दिवस लांबले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 7:21 AM