- कुमार बडदे
मुंब्राः गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात होत आहे. दरम्यान, पावसामुळे मुंब्रा बाह्यवळण (बायपास) रस्त्याजवळील डोंगरावरील दरड सोमवारी रात्री उशिरा ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोसळली. यामुळे या मार्गिकेवरील वाहतूक काही काळ संथगतीने सुरु होती.
ठाणे शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षा कडून दरड कोसळल्याची माहिती मिळताच मुंब्रा प्रभाग समितीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी एक पिकअप वाहन, एक जेसीबी आणि एक फायर वाहनासह घटनास्थळी पोहोचून जेसीबीच्या मदतीने दरड काही तासात रस्त्यावरून हटवली.
दरड हटवल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती ठामपाच्या आप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.