ठाणे - मुंब्य्रातील प्राईमकेअर रुग्णालयाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. परंतु आता या रुग्णालयाला फायर एनओसीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयाला महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत आग प्रतिबंधक उपाय योजना करण्याची नोटीसही बजावली होती. परंतु त्या उपाय योजनाही करण्यात आल्या नसल्याचे दिसून आले आहे.
बुधवारी पहाटे ३.४० वाजताच्या सुमारास मुंब्य्रातील प्राईम केअर रुग्णालयाला आग लागली. खालील बाजूस असलेल्या मीटर पॅनलमध्ये ही आग लागली. परंतु आयसीयुमध्ये सुदैवाने आग लागली नाही. परंतु ही आग पहिल्या मजल्यापर्यंत पोहचल्याचे दिसून आले. त्यातही हे संपूर्ण रुग्णालय वातानुकुलीत असल्याचेही पाहणीत दिसून आले आहे. तरी ही आग शॉकसर्कीटमुळे लागली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यातही या रुग्णालयाला एकच जीना होता. दुसरा जीना हा रॅम्पच्या स्वरुपात होता. त्यातही आता हे रुग्णालयच अनाधिकृत इमारतीत उभारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय या रुग्णालयाकडे कोणत्याही स्वरुपाची फायर एनओसी नसल्याची माहिती देखील समोर आली आहे.
कमी जागेत हे रुग्णालय सुरू असल्याचेच दिसून आले आहे. या रुग्णालयात २० रुग्ण उपचारासाठी दाखल होते. त्यातील ६ रुग्णांवर आयसीयुमध्ये उपचार सुरू होते. दुसरीकडे या रुग्णालयाला आग प्रतिबंधक उपाय योजना करण्याची नोटीस महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून बजावण्यात आली होती. परंतु त्या नोटीसीकडे देखील दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली आहे. या रुग्णालयाकडून तशा स्वरुपात कोणत्याही प्रकारची आग प्रतिबंधक उपाय योजनाच केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान आता या प्रकरणानंतर शहरातील रुग्णालये पुन्हा एकदा फायर ऑडीटच्या रडारवर आले आहेत. शहरातील अद्यापही सात ते आठ रुग्णालयांनी अद्यापही फायर ऑडीट केले नसून त्यांनी ते लवकरात लवकर करुन घ्यावे आणि त्याचा अहवाल अग्निशमन विभागाला सादर करावा असे अग्निशमन विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
संबंधीत रुग्णालयाकडे फायर एनओसी नव्हती. तसेच आग प्रतिबंधक उपाय योजना करण्याची नोटीसही त्यांना बजावण्यात आली होती. परंतु त्यांच्याकडून याची अंलमबजावणी झाली नाही.
गिरीश झळके - मुख्य अग्निशमन अधिकारी, ठामपा