मुंब्रा : देशात लोकशाहीचा उरूस सुरू असून कोट्यवधी रुपये पाण्यासारखे खर्च केले जात असताना मुंब्रा येथे जेवताना एक तंदूर रोटी कमी पडली म्हणून शमुल हुसेन या तरु णाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हुसेन याच्या कुटुंबाकडे आणखी एक रोटी आणायला पैसा नव्हता, त्यामुळे त्याने गळफास लावून घेतला की, रोटी आणण्याकरिता पुन्हा कुणी घराबाहेर पडायचे, यावरून वाद होऊन त्याने हे पाऊल उचलले किंवा वरकरणी रोटी हे कारण सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात काही वेगळेच कारण आहे, अशा सर्व शक्यतांचा शोध पोलीस घेत आहेत.येथील कौसा भागातील श्रीलंका परिसरातील चाळीमध्ये शमुल हुसेन हा पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. घरात चार माणसे असतानाही रात्री जेवणासाठी त्याने तीन रोट्या आणल्या होत्या. त्याच्या लहान मुलीने भूक लागल्याने रोटी मागितल्याने उभयतांमध्ये वाद झाला. हुसेन याची परिस्थिती बेताची असल्याने आणखी एक रोटी आणणे अशक्य असल्याने वाद सुरू झाला की, रोटी आणण्याकरिता पुन्हा कुणी खाली उतरायचे, यावरून वाद झाला, ते स्पष्ट नाही. त्याच्या पत्नीने पुन्हा रोटी कुणी आणायची, यावरून वाद झाल्याचे कारण पोलिसांना सांगितले आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजता त्याने त्याची पत्नी आणि मुलांना घराबाहेर काढून घरात फाशी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या पत्नीने दिली. आपण आपल्या पत्नी व मुलांचे धड पोट भरू शकत नाही, या अपराधी भावनेतून हुसेन याने हे कृत्य केले किंवा कसे, ते अद्याप स्पष्ट नाही.मात्र, खिशात पैसे असताना केवळ रोटी आणण्याकरिता खाली उतरण्यावरून वाद होऊन हुसेन याने आत्महत्या केली, या त्याच्या पत्नीने केलेल्या दाव्यावर विश्वास ठेवायला पोलीस तयार नाहीत. मुळात हा दावा कुणाला पटणारा नाही. त्यामुळे गरिबी, बेरोजगारी व वाढत्या महागाईतील कुतरओढ व त्यातून येणारे नैराश्य, हेच हुसेन याच्या तडकाफडकी मृत्यूला कवटाळण्यामागील कारण असू शकते, असे पोलिसांचेही मत आहे. हुसेनचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमकरिता पाठवला आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर हुसेन याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली की, अन्य कारणास्तव त्याची हत्या केल्यानंतर ही आत्महत्या असल्याचे भासवले गेले, याचा उलगडा होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास सुरू असल्याचे मुंब्रा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.>मनोविकाराची शक्यता?काही ह्युमन सायकॉलॉजीस्टचे म्हणणे आहे की, बेरोजगारी व गरिबीमुळे छोट्या कारणास्तवही माणूस मृत्यूला कवटाळू शकतो. हुसेन हा अगोदरच मानसिक आजाराने ग्रस्त होता का? त्याच्या कुटुंबीयांना ही गोष्ट लक्षात आली होती किंवा कसे, असेही प्रश्न त्यांनी केलेत.
जेवणात एक रोटी कमी पडल्याने मुंब्रा येथील तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 1:11 AM