मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या बजरंग नगर ह्या सरकारी जमिनीवर वसलेल्या बेकायदा वस्तीतील नालेसफाईसाठी पोकलेन जात नसल्याने अडथळा ठरत असलेली ४ घरे पालिकेने तोडली . यावेळी कारवाईला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने जमाव जमला असता तणाव पाहून माजी नगरसेवकास पोलिसांनी ताब्यात घेतले .
भाईंदर पश्चिमेस बजरंग नगर ही सरकारी जमिनीवर कांदळवन क्षेत्रात वसलेली वस्ती आहे . या ठिकाणी खाडीची पात्रे आत पर्यंत आलेली असून त्याचा नाला करून टाकण्यात आला आहे . सदर पात्रात परिसरातील लोक राजरोस बेकायदा कचरा टाकतात . त्यामुळे पात्र पूर्ण कचऱ्याने तुंबलेले असते . डेब्रिस आदी भर करून बांधकामे केली गेली आहेत . त्यामुळे येथील नाला पावसाळ्या आधी माणसे लावून साफ करावा लागतो . येथील बेकायदा बांधकामांना स्थानिक नगरसेवक - राजकारणी तसेच पालिका अधिकारी यांचे संरक्षण असल्याचे आरोप सतत होतात.
यंदा पालिकेने प्रशासकीय राजवट असल्याची संधी साधून नाला सफाईसाठी पोकलेन व वाहने जाण्यासाठी मार्ग करण्याचा निर्णय घेतला . त्यासाठी बुधवार १२ एप्रिल रोजी आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त मारुती गायकवाड, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी जितेंद्र कांबळे, सचिन बच्छाव, योगेश गुणीजन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुटलाल पाटील, पोलीस निरीक्षक माणिक पाटील आदींच्या उपस्थिती मोठ्या पोलीस व महाराष्ट्र सुरक्षा बल जवानांच्या बंदोबस्तात कारवाईला सुरवात केली.
परंतु कारवाईला विरोध करण्यासाठी स्थानिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने जमले . तर माजी भाजपा नगरसेवक अशोक तिवारी, पंकज पांडेय आदी सरसावले . पोलिसांनी लोकांचा विरोध मोडून काढत तिवारी यांना पकडून भाईंदर पोलीस ठाण्यात नेले . त्यांना दुपारी उशिरा सोडण्यात आले . दरम्यानच्या काळात पालिकेने तेथील ४ बेकायदा घरे तोडण्याची कारवाई केली. घरे तोडण्या आधी कोणतीच पूर्वकल्पना पालिकेने दिली नाही जेणे करून रहिवाश्यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांचे पुनर्वसन व भरपाई पालिकेने दिली पाहिजे . अन्यथा पालिकेच्या मनमानी विरोधात तक्रार करणार असल्याचे अशोक तिवारी यांनी सांगितले .