भिवंडी: भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणांची गंभीर दखल आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांनी घेत शहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना दिले आहेत. त्यानंतर भिवंडी शहरात मागील आठवड्याभरामध्ये सातशेहून अधिक अतिक्रमण हटविण्यात भिवंडी महापालिकेस यश आले आहे.
प्रभाग समिती क्रमांक पाच अंतर्गत येणारी भाजी मार्केट,नजराणा सर्कल, तीनबत्ती, कोटर गेट मस्जिद ,मंडई ठाणगेआळी, शिवाजी नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते हे रस्ता अडवून बसत असतात आणि त्यामुळे सर्व रस्ते हे वाहतुकीसाठी बंद पडलेले आहेत.त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त तथा सहनियंत्रण अधिकारी राजू वरळीकर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.या भागात दररोज सकाळ व संध्याकाळच्या दोन सत्रात अतिक्रमणांवर कारवाई सुरू केल्यानंतर येथील फेरीवाले व हातगाडी वाले यांनी त्याचा धसका घेतला आहे.रस्त्याच्या फुटपाथवरील दुकानदारांचे सर्व अतिक्रमण हटवून त्यांचे फुटपाथ वरील साहित्य मनपाकडून जप्त करण्यात आले आहे.
मागील आठवड्याभरा मध्ये महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकांवर दोन ठिकाणी दगडफेकीचे प्रकार झाले.परंतु त्यानंतर सुद्धा पालिकेचे सर्वच प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील सहाय्यक आयुक्त व सर्व अतिक्रमण विभागातील कर्मचारी हे कारवाई वर ठाम असून,पोलीस प्रशासनाच्या मदतीने भिवंडी शहरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई यापुढे अधिक वेगाने सुरू राहील असा विश्वास आयुक्त अजय वैद्य यांनी व्यक्त केला आहे.