ठाणे : मुंबईत होर्डींग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने देखील शहरात असलेल्या होर्डींगच्या विरोधात कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार मागील काही दिवसापासून ओव्हरसाईज असलेल्या ३२ होर्डींगवर कारवाई केली आहे. तर २९४ पैकी २०० होर्डींगजे स्थिरता प्रमाणपत्र पालिकेला प्राप्त झाले आहे. परंतु यापुढे जाऊन आता महापालिकेने एमएसआरडीसी, एसटी महामंडळ आणि रेल्वे यांना देखील पत्र दिले असून त्यांनी देखील होर्डींगचे स्थीरता प्रमाणपत्र सादर करावे अशी मागणी केली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत देखील मोठ्या आकाराचे होर्डींग असल्याचे दिसत आहे. मात्र आता पावसाच्या अनुषगांने आणि मुंबईत झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने देखील ठाण्यातील जाहीरातदारांची बैठक घेतली होती. त्यानंतर आठ दिवसात स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश दिले होते. तसेच ओव्हरसाईज होर्डींग हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही ओव्हरसाईज होर्डींग हटविण्यात आले नव्हते. त्यामुळे महापालिकेने प्रभाग समितीनिहाय सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित केली होती. त्यानुसार आतापर्यंत ३२ ओव्हरसाईज होर्डींगवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या जाहीरात विभागाने दिली आहे. याशिवाय २९४ होर्डींगजे स्ट्रक्चरल ऑडट करण्याचे आदेश संबधित जाहिरातदारांना दिले होते. त्यानुसार आतापर्यंत २०० होर्डींगचे स्थिरता प्रमाणपत्र सादर झाले असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तसेच ज्याठिकाणी अशा प्रकारची अनियमितता आढळली आहे, त्याठिकाणचे पत्रे काढण्यात आल्याचेही पालिकेने सांगितले.
त्या यंत्रणांना पालिकेने धाडले पत्र
ठाणे महापालिका हद्दीत एमएसआरडीसीचे १८ च्या आसपास होर्डींग आहेत. त्यांना देखील स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी ते सादर करण्यात आले आहे. मात्र रेल्वे आणि एसटी महामंडळाला ठाणे महापालिकेने त्याच संदर्भात पुन्हा स्मरणपत्र धाडले आहे. मात्र अद्यापही त्यांच्याकडून कोणत्याही स्वरुपाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. रेल्वेच्या हद्दीत ०१, एसटी महामंडळाचे ठाणे स्टेशन आणि वंदना डेपो याठिकाणी दोन होर्डींग आहेत. स्टेशन परिसरातील होर्डींग तर धोकादायक स्थितीत असल्याचे चित्र आहे.