नितीन पंडित, भिवंडी : पालिका क्षेत्रासह शहर लगतच्या ग्रामीण भागात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास पणे केला जात असून त्याविरोधात कारवाई करण्यासाठी आयुक्त अजय वैद्य यांनी संबंधित पालिका विभागांना कडाक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पालिका स्वच्छता विभागाने प्लास्टिक पिशव्यांच्या घाऊक विक्रेत्या विरोधात कारवाई करीत तेथून ८४० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून दोन कारवाईत वीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त फैसल तातली व स्वच्छता अधिकारी हेमंत गुळवी यांनी आपल्या पथकासह वंजारपट्टी नाका मेट्रो हॉटेल परिसरात प्लास्टिक पिशव्या साठवलेल्या ठिकाणी कारवाई करीत ४० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला तर ठाणगे आळी येथील महावीर ट्रेडर्स या प्लास्टिक पिशव्यांचे घाऊक विक्रेते यांच्या दुकानावर कारवाई केली.या ठिकाणी तब्बल ८०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या.या कारवाईत महावीर ट्रेडर्स चे मालक राहुल शहा यांच्यावर दहा हजार रुपये दंड वसूल केला आहे.