उल्हासनगर : शहरातून जाणाऱ्या कल्याण ते बदलापूर रस्त्याच्या पुनर्बांधणीला अडथळा नको व वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. रस्त्याची पुनर्बांधणी होईपर्यंत कारवाई सुरूच राहणार असल्याचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी सांगितले.
कल्याण ते बदलापूर रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण पाच वर्षांपूर्वी केले होते. मात्र, काही दुकानदार न्यायालयात गेल्याने रस्त्याची पुनर्बांधणी रखडली होती. न्यायालयात गेलेल्या दुकानांची जागा सोडून इतर ठिकाणच्या रस्त्याची पुनर्बांधणी एमएमआरडीएने सुरू केली. मात्र, रस्ता बांधणीच्या आड रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या शेकडो गाड्यांसह दुकानदारांनी रस्त्यावर वाढीव बांधकाम केले. त्यावर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीने असंख्य बंद पडलेल्या गाड्या उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बांधकाम विभागाने शहरातून जाणाऱ्या या रस्त्याच्या पुनर्बांधणीकडे लक्ष द्यायला हवे होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होत आहे.