भिवंडी- शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने बाधीत रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील 13 रुग्णालयांना कोव्हिड - 19 म्हणून मान्यता देऊन रुग्णांवर उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र रुग्णांकडून सरकारी निर्देशानुसारच बील घेण्यात यावे असेही पालिका प्रशासनाने सुचित केलेले आहे. त्यासाठी शासनाने 14 मार्च 2020 रोजी अधिसूचनेद्वारे मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करून त्यानुसार खासगी रुग्णालयात सेवा-सुविधांचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत.हे दर सर्व कोव्हीड 19 रुग्णालयांना लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच रुग्णालयांनी बील घेणे आवश्यक आहे. शहरात अलमोईन (40 बेड ) ,वऱ्हाळ देवी( 22 बेड ),खातूनबी काझी(14) ,अनमोल(30) ,सिपंथी(25), डॉ.वाघमारे(20), ऑरबीट(30), सिराज(45), मेयर (20),स्व .काशिनाथ पाटील(15),आरोग्यम हॉस्पिटल(25), सिटी हॉस्पिटल(10),अलहज (134 बेड )आदी खाजगी हॉस्पिटल कोव्हीड म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मात्र यातील काही खाजगी रुग्णालयातून काही रुग्णांकडून जादा बील वसूल केल्याचे समोर आले आहे.याबाबत नागरिकांनी तक्रारी दाखल केल्याने त्याची तातडीने दखल आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी घेऊन शहरातील तीन कोव्हीड रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.यामध्ये गायत्री नगर येथील अनमोल, नारपोली येथील स्व.काशिनाथ पाटील आणि मंडई प्रभू आळी येथील ऑर्बिट हॉस्पिटल आदींचा समावेश आहे.सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांचे उपचाराच्या बिलांची तपासणी पालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने केली.त्यामध्ये या हॉस्पिटल प्रशासनाने जादा बिलांची वसूली केल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्या आदेशाने पालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नितीन मोकाशी यांनी या रुग्णालय व्यवस्थापनास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.या रुग्णालयाकडून खुलासा मागविण्यात आला आहे. सदरचा खुलासा समाधानकारक नसल्यास या रुग्णालयांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करून प्रसंगी हॉस्पिटलचे परवाने रद्द करणार असल्याचे स्पष्ट संकेत आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी दिले आहेत.
भिवंडीत कोरोना रुग्णांकडून जादा बिल घेणाऱ्या रुग्णालयांना पालिका प्रशासनाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 6:45 PM