राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने रुग्ण व शववाहिकांच्या दरात तिपटीहून अधिक वाढ केल्याने सर्वसामान्य माणसांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी आता सुरू झाल्याने अगोदर ४ रुपये प्रतिकिमी दराने उपलब्ध करून दिल्या जाणाºया रुग्णवाहिकेकरिता आता १५ रुपये प्रतिकिमी दर आकारला जात आहे.पालिकेने रुग्णांना माफक दरात रुग्णवाहिका पुरवण्यासाठी सुरू केलेल्या सुविधेच्या दरात अचानक वाढ केली आहे. खाजगी रुग्णवाहिकेच्या प्रतिकिलोमीटर ११ ते १२ रुपये दराच्या तुलनेत प्रतिकिलोमीटर ४ रुपये हा दर अत्यंत कमी असल्याने सामान्य, गोरगरीब रुग्णांना व त्यांच्या नातलगांना आधार मिळत होता. त्याचबरोबर, शहरातील गरीब रुग्णांच्या मृत्यूपश्चात त्यांचे शव अंत्यसंस्काराकरिता वाहून नेण्यासाठी पालिकेने २ वर्षांपूर्वी शववाहिनी मोफत उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. शहराबाहेर शववाहिनी घेऊन जाण्यासाठी मात्र प्रतिकिमी ४ रुपये दर आकारण्यात येत असे. खाजगी रुग्ण व शववाहिकेच्या तुलनेत पालिकेच्या रुग्णवाहिकेचा दर ७ ते ८ रुपयांनी कमी असल्याने त्याचा लाभ अधिकाधिक रुग्णांकडून घेतला जाऊ लागला. परंतु, वाढती महागाई व इंधनाचे वाढलेले दर यामुळे पालिकेने रुग्णवाहिकेच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव १९ जूनच्या महासभेत सादर केला. त्यात सध्याच्या प्रतिकिलो मीटरचा दर ४ रुपयांवरून थेट १५ रुपये करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्याला महासभेने मान्यता दिली. दरम्यानच्या काळात मीरा-भार्इंदर महापालिकेची निवडणूक झाल्याने हे वाढीव दर अमलात आले नाहीत. मात्र, आता प्रशासनाने वाढीव दराची आकारणी सुरू केली. पालिकेकडे सध्या एकूण ३ शववाहिका, ६ रुग्णवाहिका व आ. प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून सेवेत दाखल झालेली १ अद्ययावत कार्डिओ रुग्णवाहिका आहे. पालिकेने लागू केलेले नवे दर खाजगी रुग्ण व शववाहिकांच्या तुलनेत ४ ते ५ रुपये अधिक असल्याने सामान्य रुग्णांना ते आवाक्याबाहेर वाटूलागले आहेत. त्यातच पालिकेच्या रुग्ण व शववाहिकांना जिल्ह्यातच येजा करण्यास परवानगी असल्याने जिल्ह्याबाहेर जाण्यास खाजगी रुग्णवाहिकांचाच आधार घ्यावा लागतो. यामुळे पालिकेच्या रुग्णवाहिकांचा वापर कमी होऊन खाजगी रुग्णवाहिकांचा वापर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पालिका रुग्णवाहिकांच्या तुलनेत खाजगी रुग्ण व शववाहिकांचे दर प्रतिकिलोमीटरसाठी ११ ते १२ रुपये व परराज्यांत जाण्यासाठी १६ ते १८ रुपये आकारले जात आहे. त्यामुळे तो न परवडणारा आहे.
पालिकेच्या रुग्णवाहिकेच्या दरात तिप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 1:22 AM