मीरारोड - भाईंदर व मीरारोड येथील दोन रिक्त जागां करिता होणाऱ्या पोटनिवडणुका रद्द करण्याची विनंती खुद्द महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना केली आहे . पालिकेवर पडणारा खर्चाचा बोजा , पुढील वर्षी होणारी सार्वत्रिक निवडणूक आणि आचार संहिता आदी कारणे आयुक्तांनी नमूद केली आहेत.
भाईंदर पूर्व येथील शिवसेना नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर यांचे गेल्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले तर मीरारोड मधील काँग्रेस नगरसेविका उमा सपार यांचे काही महिन्या पूर्वी आजारपणा मुळे निधन झाले असल्याने ह्या ४ नगरसेवकांच्या प्रभागातील प्रत्येकी १ जागा रिक्त झाली.
पुढील वर्षी ऑगस्ट मध्ये महापालिकेची मुदत संपणार असल्याने त्या आधी सार्वत्रिक निवडणुका घ्याव्या लागणार आहेत . तसे असताना निवडणूक आयोगाने ह्या दोन जागां साठी पोटनिवडणूकच्या अनुषंगाने मतदार यादी व मतदान केंद्र अंतिम करण्यासाठी आदेश दिल्याने पालिका कामाला लागली आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आधीच आचार संहिते मुळे कामांवर होणारा परिणाम आणि अत्यल्प काळासाठी नगरसेवक पद राहणार असल्याने पोटनिवडणुकीला विरोध करत ती रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगास केली आहे. तर आता खुद्द महापालिका आयुक्तांनीच निवडणूक आयोगाला पोटनिवडणूक रद्द करण्याचे साकडे घातले आहे .
मीरा भाईंदर महानगरपालिकेची मुदत २७ ऑगस्ट २०२२ रोजी संपत असून फक्त ९ महिने राहिले आहेत. सध्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून त्या नंतर निवडणूक कार्यक्रम घोषीत होईल जो साधारण २५ ते ३० दिवसांचा असेल. सार्वत्रिक निवडणूकीकरीता जवळपास दिड ते दोन महिने कालावधी हा आचारसंहितामध्ये जाणार आहे.सध्या महानगरपालिकेमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दती असल्याने प्रभागाती ल एक सदस्याची जागा जरी रिक्त झाली तरी अन्य उर्वरीत ३ सदस्य संबंधित प्रभागातील जनतेचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने प्रभागातील नागरीकांची गैरसोय होत नाही.
नजिकच्या काळात सार्वत्रिक निवडणूक येऊ घातल्याने पुन्हा अतिशय कमी कालावधी करीता होणाऱ्या पोटनिवडणुकीकरीता महानगरपालिकेचा निवडणुकीवरील खर्च अनाठायी होणार आहे . तसेच कोविड विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपला नसल्याने कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करता पोटनिवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात यावा असे पालिकेचे मत असल्याचे आयुक्त ढोले यांनी पत्रात म्हटले आहे.