सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका अंतर्गत येणाऱ्या शासनाच्या विविध आपत्ती व्यवस्थापन विभागाची पूर्वतयारी बैठक आयुक्त अजीज शेख यांनी मुख्यालयात गुरवारी घेतली. बैठकीला पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, आयोजित करण्यात महावितरण, रेल्वे प्रशासन , वाहतूक विभाग आदीचे अधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीतून बारमाही वाहणारी उल्हास नदी तसेच वालधुनी नदी वाहते. पावसाळ्यात दोन्ही नदीच्या पुराचा फटका शहरवासीयांना बसत असून वित्त व जीवितहानी होते. यासर्व पाश्वभूमीवर महापालिका अंतर्गत येणाऱ्या विविध विभागानी त्यांच्या अंतर्गत मान्सूनपूर्व तयारी कशी केली. याबाबतचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी महापालिका मुख्यालयात आपत्ती व्यवस्थापन बाबत गुरवारी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी महापालिका, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, महावितरण, रेल्वे प्रशासन, वाहतूक पोलीस इत्यादी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्वांनी मान्सूनपूर्व बाबत केलेली तयारीची माहिती यावेळी दिली.
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी आयोजित केलेल्या बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, करूणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवडे, शहर अभियंता प्रशांत सोळंके, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख बाळू नेटके, अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी, वैधकीय अधिकारी डॉ अनिता सपकाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, संजय गायकवाड, रणजीत डेरे, दिलिप फुलपगारे, यांच्यासह तहसिलदार अमित बनसोडे, नागरी संरक्षण दलाचे शाम गांगुर्डे यांच्यासह महापालिकेचे विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी सर्वांनी आपत्ती व्यवस्थापन बाबत केलेल्या तयारीची माहिती दिली. विभागांतर्गत समन्वय ठेवण्यासाठी कार्यप्रणालीवर चर्चा झाली. संभाव्य आपत्ती बाबत माहिती देऊन सज्ज होण्यासाठी काय करता येईल याबाबत माहिती आदानप्रदान केली.
पुन्हा होणार आपत्ती व्यवस्थापन बैठक
गेल्या वर्षी झालेल्या पूरपरिस्थिती व त्याबाबत केलेल्या तयारी बाबत चर्चा करण्यासाठी सर्व विभाग व आजी व माजी लोकप्रतिनिधी यांची पुन्हा आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी व उपाययोजना बाबत बैठक आयोजित करण्याचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"