ठाणे : शहरातील नाले सफाईच्या कामाची पाहणी सोमवारी महापालिका आयुक्त डॉक्टर विपीन शर्मा यांनी केली. त्यानुसार शहरात नालेसफाई, खड्डे बुजविणे, रस्ते दुरुस्ती आणि इतर अत्यावश्यक कामे केल्याचा दावा यावेळी आयुक्तांनी केला.
सकाळी ११ वाजता आयुक्तांनी नितीन कंपनी येथून नालेसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली. या दौऱ्यादरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्थानिक नगरसेवकांशी संवाद साधत प्रभागातील अडचणी तसेच उपाययोजनांबाबत चर्चा केली. यावेळी नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता फाटक, शिक्षण समिती सभापती योगेश जानकर, नगरसेवक संतोष वडवले, एकनाथ भोईर, राम रेपाळे, दीपक वेतकर, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपआयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रवींद्र खडताळे, उपनगर अभियंता अर्जुन अहिरे तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते. रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी नागरिकांसाठी रस्ता खुला करण्याचे आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सखल भागात पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्यासोबतच ज्या ठिकाणी पाणी साचेल तेथील पाण्याच्या निचरा होण्याच्या दृष्टीने उपसा पंप लावणे तसेच इतर आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागास केल्या. कोरम मॉल नाला, कामगार नाला, आंबेवाडी नाला इंदिरानगर, नवीन पासपोर्ट ऑफिस, तसेच केळकर नाल्याची त्यांनी पाहणी केली. कामगार नाल्याचे रुंदीकरण करण्यासोबतच नाले सफाईची अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करून सुकलेला गाळ त्वरित उचलण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. दरम्यान, ज्ञानेश्वरनगर, इंदिरानगर रोड क्र. २२, साठेनगर येथील रस्त्याच्या कामाची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यासोबतच रस्त्याच्या बाजूला असणारे मातीचे ढीग, कचरा तत्काळ साफ करून नवीन दुभाजक बसविण्याचे आदेशही त्यांनी दिले.