ठाणे : ठाण्यात झालेली चांगली आणि विकासात्मक कामे ही पालिका आयुक्तांनी केली आहेत. दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजपा करीत असल्याची टीका नितीन सरदेसाई यांनी केली.मनसेच्या हायटेक कार्यालयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. गेल्या निवडणुकीपेक्षा ठाण्यातील मनसे नगरसेवकांची संख्या निश्चितच अधिक असेल आणि मनसेचे महत्त्वही वाढेल. महापौर बसण्याच्या प्रक्रियेत मनसेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असेल, असा दावा सरदेसाई यांनी केला. आम्ही स्वत:च्या ताकदीवर सर्व जागा लढवणार आहोत. अद्याप सेना-मनसे युतीचा प्रस्ताव आमच्याकडे आला नसल्याने त्यावर सध्या विचार करण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात भाजपाची हवा आहे की नाही, ते माहीत नाही, पण मनसेची हवा नक्कीच आहे. प्रशासनाने चांगले काम केले की, श्रेय स्वत:कडे घ्यायचे आणि चुकीचे केले की, प्रशासनावर ढकलायचे, हे ठाण्यात नव्हे तर मुंबईतही होत आहे. दोन्ही पक्षांची ही जुनी सवय आहे. मात्र, जनता सुजाण आहे. त्यांना नक्की माहीत आहे की, चांगल्या कामाचे श्रेय कोणाला द्यायचे, असे ते म्हणाले. नाशिकमध्ये आमची सत्ता असताना जी कामे आम्ही केली, ती इथल्या जनतेसमोर मांडत आहोत. हाच ठाणे निवडणुकीतील आमचा जाहीरनामा आहे, असे स्पष्ट करून सरदेसाई म्हणाले की, पाच वर्षे सत्ता मिळाल्यावर इतके चांगले काम इतर कोणत्याही शहरात कोणत्याही पक्षाने केलेले नाही. मनसेचे अभिजित पानसे, राजू पाटील, ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव आदी या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विकासकामांचे श्रेय पालिका आयुक्तांचे
By admin | Published: January 29, 2017 3:19 AM