ठाणे : कल्याणमध्ये रस्त्यावरील खड्डा चुकवितांना झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वराचा मृत्यु झाला आहे. या घटनेनंतर ठाणे महापालिका देखील आता या बाबतीत खबरदारी घेत आहे. त्यानुसार शहरातील प्रत्येक प्रभाग समितीमधील रस्त्यांवर बारकाई लक्ष देण्याच्या सुचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत. खड्डा पडल्याचे दिसताच ते तत्काळ बुजविण्यात यावेत. परंतु खड्यात पडून एखादा अनुचित प्रकार घडला तर त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन निलंबनाची कारवाई केली जाईल असा गंभीर इशाराच आयुक्तांनी दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिका आयुक्तांनी सोमवारी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांबाबत आढाव घेतला, या बैठकीला इतर प्राधिकरणाचे देखील अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा इशारा दिल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. यावेळी त्यांनी पुढील दोन दिवसात शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे पावसाची उघडीप मिळताच तत्काळ बुजविण्यात यावेत असे निर्देश दिले. त्यानुसार नियोजन आखण्यात यावे ठाणेकरांना सुरक्षित रस्ते कसे देता येतील यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. प्रत्येक प्रभाग समिती निहाय अधिकाऱ्यांनी रस्त्यांची पाहणी करावी, नागरीकांच्या तक्रारींचा वाट न पाहता, तत्काळ खड्डे बुजविण्यात यावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
त्यातही काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये रस्त्यावरील खड्डा चुकवितांना एकाचा अपघात होऊन मृत्यु झाला होता. ठाण्यातही भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी चोख पार पाडावी अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार त्या त्या प्रभाग समितीमधील अधिकाºयांवर जबाबदारी देखील निश्चित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. परंतु तरी देखील भविष्यात रस्त्यावरील खड्यामुळे एखादी अनुचित घटना घडली तर त्यानुसार त्या विभागातील अधिकाºयावर जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाईल असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.
वागळे येथील त्या रस्त्याची दुरुस्ती
वागळे इस्टेट भागातील रस्त्यावर देखील खड्डे पडल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी त्याची दखल घेतली आहे. महापालिकेच्या रस्त्यांच्या यादीत हा रस्ता असला तरी पावसामुळे त्याचे काम करता आलेले नाही. परंतु आता आता नागरीकांना किंवा वाहन चालकांना त्याचा त्रास होऊ नये या दृष्टीने त्याची दुरुस्ती करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले असून दोन दिवसात हा रस्ता चांगला तयार करुन देण्याचे आश्वासन पालिकेने दिले आहे.
तुमच्यामुळे महापालिकेवर टीका
घोडबंदर भागात सर्वाधिक खड्डे पडले आहेत. परंतु त्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मेट्रोची असतांना देखील त्याचे नाहक खापर हे महापालिकेवर फोडले जात असून महापालिकेची बदनामी होत असल्याची खंत महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे येथील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याबरोबर रस्त्यावर पाणी साचू नये यासाठी नाल्यांची आणि गटारांतील गाळ काढण्याच्या सुचनाही यावेळी आयुक्तांनी दिल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.