ठाणे : मुंब्य्रातील रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या ११६ बाधितांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. यापैकी एका ७२ वर्षीय वृद्धाने पुनर्वसनाच्या मागणीसाठी महापालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. शनिवारी उपोषणाचा पाचवा दिवस असताना अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याच वेळेस पालिकेने त्यांच्या उपोषणाचा मंडप उखडल्याने आता जमिनीवर बसून उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते के. गुलाब उस्मान मुलाणी यांनी पालिकेला दिला आहे.ठाणे महापालिकेच्या वतीने मुंब्य्रात मुंबई-पुणे रोडवर रुंदीकरणाची मोहीम ९६-९७ मध्ये हाती घेतली होती. त्यानंतर, पुन्हा २००१ मध्ये शिवसेना शाखा ते सुन्नी कबरस्तान असे रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. या रस्ता रुंदीकरणात तब्बल १४६ दुकानदार आणि इतर रहिवासी बाधित झाले होते. या बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेने त्यांच्याकडून लेखी स्वरूपात सर्व लिहून घेतले होते. तसेच जागेचे पुरावेदेखील या बाधितांनी पुरावे म्हणून पालिकेला सादर केले आहेत. परंतु, यातील काहींचेच मेक कंपनीजवळ एका जागेत पुनर्वसन करण्यात आले. असे असले तरी अद्यापही तब्बल ११६ बाधितांचे पुनर्वसन झाले नसल्याचा आरोप उपोषणकर्ते मुलाणी यांनी केला आहे. मुलाणी यांचेदेखील रस्ता रुंदीकरणात दोन गाळे तोडले होते. परंतु, त्यांच्याकडून एकच गाळ्यासाठी लिहून घेण्यात आले. (प्रतिनिधी)
उपोषणकर्त्याचा मंडपच पालिकेने तोडला
By admin | Published: January 09, 2017 7:24 AM