बदलापूर शहरातील मुख्य उड्डाणपुलाखाली असलेल्या मच्छी मार्केट येथून पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा भुयारी मार्ग आहे. भुयारी मार्गालगत असलेल्या नाल्याला पावसाळ्यात अनेक वेळा पूर येतो. काही दिवसांपूर्वी हा मार्ग वाहनचालकांसाठी बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. प्रशासनामार्फत या भुयारी मार्गात लोखंडी खांब बसवून हा भुयारी मार्ग वाहन चालकांसाठी बंद करण्यात आला. तरीही या भुयारी मार्गातून पादचारी ये-जा करीत असल्याचे पाहायला मिळत होते. या भुयारी मार्गाच्या स्लॅबची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने तो सर्वांसाठीच धोकादायक ठरत आहे. नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळावा, तसेच लवकरात लवकर या मार्गाची डागडुजी करावी, अशी मागणी बदलापूरकर करीत आहेत. या रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
-------