ठाणे : ठाणे महापालिकेने प्रभाग समितीनिहाय बेकायदा बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सुरूच केली असून शनिवारी दिवा प्रभाग समिती व वर्तकनगर प्रभाग समितीतील वाढीव बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
या कारवाईअंतर्गत दिवा प्रभाग समिती येथील मुंब्रादेवी कॉलनी अधिक तीन मजली इमारतीतील चाैथ्या मजल्याचे वाढीव बेकायदा बांधकाम पाडण्यात आले. तसेच वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रांतर्गत पोखरण रोड क्र. १, उपवन इंडस्ट्रीज प्लॉट न. २०६ येथील रवी अच्युत पुजारी यांच्या ३२ बाय ५२ चौरस फूट मोजमाप असलेल्या जागेवर विटांची भिंत व लोखंडी अँगलची उभारणी करून बेकायदा बांधकाम करण्यात आले होते. हे बांधकाम शुक्रवारी जेसीबी मशीनच्या साहाय्याने पाडण्यात आले. ही कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त महेश आहेर व सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.