ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 19 - पक्ष चालवण्यासाठी आम्हाला महापालिकेचा पैसा लागत नाही, भाजपात व्यावसायिक कार्यकर्ते नाहीत, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. तसेच महापालिका हे दुकान नाही, तर ते लोकसेवेचे साधन आहे, असंही ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाण्यातील पाचपाखाडीत सभा घेतली. त्या सभेत ते बोलत होते. आज आनंद दिघेंची शिवसेना राहिलेली नाही. ही स्वार्थी लोकांची शिवसेना आहे, एकेका घरात 4-4 तिकिटे वाटली गेली आहेत, असा आरोपही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. स्वराज्याला सुराज्याकडे नेण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. राजाच्या मुद्रेपेक्षा त्याचा लौकिक वाढला पाहिजे, हे शिवरायांनी सांगितले. पण तसे होताना दिसून येत नसल्याची खंतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आणीबाणीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार तरी आहे का? तेव्हा तर तुम्ही समर्थन करत होता, लोकशाही परत आणणारे आम्ही आहोत. आणीबाणीत माझे वडील कारागृहात होते, त्यांच्या यातना मी पाहिल्या आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पक्ष चालवायला महापालिकेचा पैसा लागत नाही- मुख्यमंत्री
By admin | Published: February 19, 2017 5:55 PM