मीरारोड - २८ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव पार पडल्या नंतर देखील आठवडाभर रस्त्यातच डेब्रिस, कचरा टाकून ठेवणाऱ्या भाईंदरच्या मोदी पटेल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास यंदा महापालिकेने तिसऱ्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवले होते. तर आता मंडळास पालिकेने दंडाची पावती पाठवली आहे.
भाईंदर पश्चिमेस मोदी पटेल मार्गावर सार्वजनिक गणेशोत्सव होऊन आठवडा झाला तरी भर रस्त्यात मंडळाचे मंडपातील पीओपीचे डेब्रिस, बॅनर आदी कचरा पडून असल्याने वाहतुकीला व रहदारीला त्रास होत असल्याची बाब स्थानिक जागरूक रहिवाश्यांनी निदर्शनास आणून दिली होती. १ ऑक्टोबर रोजी शहर भर स्वच्छता अभियान राबवणाऱ्या पालिकेच्या सदर भागातील कर्मचाऱ्यां कडून देखील या कडे दुर्लक्ष झाल्या बद्दल सवाल केले जात होते.
लोकमतने या बाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्या नंतर सदर रस्त्यावरचा कचरा हटवण्यात आला. तर अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे आणि उपायुक्त रवी पवार यांनी या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा करत कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार पालिकेने मंडळास दंड भरण्यास बजावले आहे.
विशेष म्हणजे सदर मंडळास महापालिकेनेच यंदाच्या गणेशोत्सव स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे पारितोषिक दिले होते. त्यामुळे पालिकेच्या पारितोषिक विजेत्या मंडळा कडूनच पीओपी सह अन्य डेब्रिस, कचरा भर रस्त्यात टाकला गेल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होऊ लागले. त्यामुळे महापालिका भविष्यात अशा मंडळांबाबत काय कार्यवाहीची भूमिका घेते या कडे लक्ष लागले आहे.