सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-४, सुभाष टेकडी येथील डॉ आंबेडकर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाला सोमवार पासून सुरुवात झाली आहे. पुतळा परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार असून ३ महिन्यांचा कालावधीत पुतळ्याचे काम पूर्ण होणार आहे.
उल्हासनगर सुभाष टेकडी परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात पुर्णाकृती पुतळ्याची मागणी स्थानिक नागरिकांसह पुतळा स्मारक समितीने लावून धरला होता. अखेर शासनाने मूलभुत सुखसविधा योजने अंतर्गत पुतळ्यासाठी एक कोटीचा निधी दिला आहे. शासनाने निधीला मंजुरी दिल्यावर, महापालिकेने निविदा प्रसिद्ध केल्यानंतर, ठेका लालसाई कॅन्शट्रक्शन कंपनीला देण्यात आला.
आमदार डॉ. बालाजी किन्हीकर यांच्या हस्ते सोमवारी पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष अरुण कांबळे, शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक रमेश चव्हाण, प्रमोद टाले, वंचित आघाडीचे नेते सारंग थोरात, स्मारक समितीचे सदस्य आर एस गवई, अरुण काकळीज, सुभाष साळूंखे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ३ महिन्यात पुतळ्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिका शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली आहे.