ठाणे : शहरात डान्स बारमध्ये सुरू असलेल्या छमछमप्रकरणी दोन सहायक पोलीस आयुक्तांसह दोन पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई केल्यानंतर ठाणे महापालिकेने मंगळवारी दुपारी चारनंतर सुरू असलेले तब्बल १५ बार सील केले आहेत.
शहरात ऑर्केस्ट्रा बार ॲण्ड रेस्टॉरंट (डान्स) सुरू असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना मिळताच त्यांनी याबाबत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीनंतर नौपाडा आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना निलंबित करून मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे. नौपाडा व वर्तकनगर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांनाही नियंत्रण कक्षात संलग्न केले आहे. त्याचबरोबर संबंधित ऑर्केस्ट्रा बार ॲण्ड रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल करून त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू केल्याची माहिती पोलिसांनी देताच, महापालिकेला ऑर्केस्ट्रा बार ॲण्ड रेस्टॉरंट सील करण्याची कारवाई करण्याबाबतही कळविले आहे. त्यानुसार महापालिकेच्या त्या-त्या प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई मंगळवारी सकाळी सुरू करत दुपारपर्यंत १५ बार सील केले. यामध्ये तलावपाळी येथील आम्रपाली, तीन पेट्रोल पंपाजवळील अँटिक पॅलेस, उपवन येथील नटराज व सूर संगम, सिनेवंडर येथील आयकॉन, कापूरबावडी नाक्यावरील स्वागत व सनिसटी, नळपाडामधील नक्षत्र, पोखरण रोड नंबर २ येथील के नाईट, ओवळा नाक्यावरचा स्टर्लिंग व मैफिल, वागळे येथे सिझर पार्क, नौपाड्यात मनीष, मॉडेला नाका येथील अँजेल आणि भाईंदर पाडामधील खुशी अशी पंधरा सीलबंद केलेल्या बारची नावे आहेत. कोरोनाकाळात दुपारी चारनंतरही बार सुरू असल्याने ही कारवाई केल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.