ठाणे - ठाणे महापालिकेत घेण्यात आलेल्या चालक भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत ही भरती प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी मागील महिन्यात झालेल्या महासभेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले होते. परंतु महापौरांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित प्रशासनाने चालकांची यादी प्रसिध्द केली आहे.महापालिकेत ७५ चालकांची भरती प्रक्रिया घेण्यात आली. त्यानुसार यासाठी ४ हजार ११५ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातून वाहन टेस्टच्या वेळेस १०८२ उमेदवार गैरहजर राहिले. तर ३०३३ उमेदवार हजर होते. त्यातील ४५३ उमेदवारांना हेवीचे लायसन्स नसल्याने रद्द करण्यात आले. तर २५८० उमेदवारांनी यावेळी वाहन चाचणी दिली आहे. परंतु मागील महिन्यात झालेल्या महासभेत ठाणे महापालिकेकडून सुरु असलेल्या या चालक भरती प्रक्रियेच्या मुद्यावर चांगलेच वादळ पेटले होते. ज्या उमेदवारांकडे हेवी व्हेईकलचे लायसन्स नसेल त्यांची दुसरी परिक्षा घेतलीच कशी असा अपेक्षा उपस्थित करुन केवळ काही ठरविक जिल्ह्यातीलच उमेदवारांना या भरतीत संधी दिली जात असल्याचा आक्षेपही सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी घेतला होता. दुसरीकडे ज्या ज्या बाहेरच्या जिल्ह्यात परिक्षा झाल्या, त्या ठिकाणी आपल्या पालिकेतील क्लासवन आॅफीसर, शासनाकडून आलेले अधिकारी हे स्वत: जाऊन, आपल्या जिल्ह्यातील उमेदवारांना अधिकचे मार्क्स द्यावेत अशी विनंती केली असल्याचा गौप्यस्फोटही यावेळी झाला होता. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतच मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानुसार ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशी मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली होती.दरम्यान या संदर्भात आस्थापना विभागाचे उपायुक्त संजय निपाणी यांनी ही प्रक्रिया संपूर्ण पारदर्शकतेने झाली असून लाईट आणि हेवी असा उल्लेख फॉर्ममध्येच करण्यात आला होता. त्यानुसार काहींनी त्याठिकाणी टिक केली होती. परंतु प्रत्यक्षात त्यांच्याकडे हेवी लायसन्स नसल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना या प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी स्पष्टीकरण केले होते. परंतु असा खुलासा केला असतांना देखील, लोकप्रतिनिधींनी याला विरोध लावून धरल्याने अखेर या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले होते. ठाणे जिल्ह््यातील स्थानिकांना नोकर भरतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वपक्षीय भेट घेण्यात येईल आणि त्यांच्या भेटीनंतरच वाहन चालक भरतीच्या स्थिगतीबाबात पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आदेशही त्यांनी दिले होते. त्यानुसार नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे. परंतु ही भरती प्रक्रिया रद्द करता येत नसल्याचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी महासभेत स्पष्ट केले होते.या स्थगितीनंतरही महापालिका प्रशासनाने नोकर भरती प्रक्रि ये उरकण्याच्या हालचाली सुरु केल्या असून त्यासाठी संबंधित उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादीच पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. यावरून महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिकेच्या चालक भरतीला स्थगिती असतांना पालिकेने जाहीर केली यादी, महापौरांच्या आदेशाला केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 3:20 PM
ठाणे महापालिकेतील चालक भरती प्रक्रियेला महापौरांनी मागील महिन्यात झालेल्या महासभेत स्थगिती दिली असतांना पालिकेने मात्र त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. पालिकेने या उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी प्रसिध्द करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे.
ठळक मुद्देचालक भरती प्रक्रियेवर वांदग होणार निर्माणभरती प्रक्रिया नियमानुसारच पालिकेचे पुन्हा स्पष्टीकरण