ठाणे : हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २९७ पैकी ३९ बांधकाम व्यावसायिकांना ठाणे महापालिकेने कारणे दाखवा नाेटिसा बजावल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाय केले जात आहेत. त्यामुळे २९७ बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले हाेते. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या ३९ बांधकाम व्यावसायिकांनी नियमावलीचे तत्काळ पालन न केल्यास त्यांना तातडीने काम थांबविण्याचे आदेश दिले जाणार आहेत.
ठाण्यातील २९७ बांधकाम व्यावसायिकांपैकी ३१ जणांनी सर्व नियमावलीचे पालन केले, तर १५१ जणांकडे काही त्रुटी आढळल्याने त्यांना सुमारे चार लाखांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावले आहे. ३९ जणांनी नियमावलीची पूर्तता न केल्याने त्यांना बांधकाम का थांबवू नये, अशी विचारणा करणारी नोटीस ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बजावली. त्यांच्याकडून नियमांची पूर्तता न झाल्यास काम तत्काळ थांबविण्याचे आदेश काढावेत, असे निर्देश माळवी यांनी दिले. सर्व २९७ बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी, असेही माळवी यांनी स्पष्ट केले.
अतिरिक्त आयुक्तांनी घेतला आढावा- ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.- या उपाययोजनांचा आढावा बुधवारी माळवी यांनी घेतला. या आढावा बैठकीस, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त पद्मश्री बैनाडे यांच्यासह महापालिकेचे अनेक अधिकारी उपस्थित होते.
आदेश काय दिले?सर्व यंत्रणांनी महापालिकेच्या समन्वयाने उच्च न्यायालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश माळवी यांनी दिले. हवा प्रदूषणाबाबत महापालिकेकडे प्राप्त झालेल्या विविध तक्रारींबाबत पर्यावरण विभागाने १ लाख ७० हजारांच्या दंड वसुलीची कारवाई केल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, विकासकांनी प्रकल्पात, ५० ठिकाणी हवा प्रदूषण मोजणी यंत्र बसविले आहे. इतरांनीही ही यंत्रणा बसवावी. कुचराई झाल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा माळवींनी दिला.