ठाणे : ठाण्यात पुन्हा काही अंशी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. मात्र मे अखेरपर्यंत हवेतून ऑक्सिजननिर्मिती करून ४० टक्के कमतरता भरून काढण्याचा दावा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मंगळवारी केला. महापालिकेच्या तीन कोविड सेंटरला सध्या दिवसाला ६२ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. परंतु ४७ मेट्रिक ऑक्सिजन उपलब्ध आहे. महापालिकेच्या माध्यमातून सध्या ३.२ मेट्रिक टन निर्मिती केली जात आहे. परंतु, मेअखेरपर्यंत ती वाढवून १५ मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या तीन सेंटरच्या ठिकाणी आणखी ३६ मेट्रिक टनचे टॅंक उभारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ग्लोबल, पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास येथे तीन कोविड सेंटर पालिका चालवत आहे. व्होल्टास येथील कोविड सेंटर लवकरच सुरू केले जाणार आहे. या तीनही ठिकाणी प्रत्येकी १२ मेट्रिक टन ऑक्सिजनचे टॅंक उपलब्ध आहेत. मेअखेर या तीनही ठिकाणी अतिरिक्त १२ मेट्रिक टनचे टॅंक पालिका उभारणार आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही, तर यातील हे १२ मेट्रिक टनाचे टॅंक पुढील २४ तासासाठी कामाला येऊ शकणार आहेत. सध्या पार्किंग प्लाझा येथे हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा प्लान्ट उभारला आहे, त्यातून दिवसाला ३.२ मेट्रिक टन निर्मिती होत आहे. हा ऑक्सिजन येथील ३५० बेडसाठी पुरत आहे. त्यामुळे या ३५० बेडसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन वापरले जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिल्लक मेडिकल ऑक्सिजन हे व्हेंटिलेटर आणि आयसीयूसाठी वापरले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हेच हवेतून निर्माण होणारे ऑक्सिजन व्हेंटिलेटर किंवा आयसीयूसाठी वापरले गेले तर तर ६० बेडसाठीच ते वापरले जाऊ शकणार आहे.
मेअखेर १५ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती सध्या पार्किंग प्लाझा येथे ३.२ मेट्रिक टन हवेतून ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. परंतु, आता येथील क्षमता आणखी दोन मेट्रिक टनने वाढवून ती ५.२ मेट्रिक टन करण्यात येणार आहे. ग्लोबल रुग्णालय आणि व्होल्टास येथेदेखील प्रत्येकी ५ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे मेअखेर १५ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होणार असून ठाणे ही देशातील ४० टक्के ऑक्सिजन निर्माण करणारी पहिली महापालिका ठरणार असल्याचा दावा आयुक्तांनी व्यक्त केला.
ठाण्यात विवियाना मॉलच्या पार्किंगमध्ये फक्त नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकांसाठीच ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र बुधवारपासून सुरू करण्यात येत असून केवळ १०० ज्येष्ठ नागरिकांनाच सकाळी १० ते १ या वेळेत कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. या केंद्रावर फक्त कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. येथे नागरिकांना पहिला डोस दिला जाणार नसल्याचे ठाणे महापालिकेने स्पष्ट केले.