उल्हासनगर : डम्पिंग हटावची मागणी करून आमरण उपोषण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला महापालिकेने डम्पिंग डिसेंबर २०२५ नंतर हटविणार असल्याचे लेखी उत्तर दिले. या उत्तराने डम्पिंगचा फास नागरिकांच्या भोवती दीड वर्ष राहणार असल्याचे उघड झाले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५, येथील खडी खदान डम्पिंग ग्राऊंड परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा टाहो फोडत डम्पिंग हटावची मागणी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी करून, नेताजी चौकात आमरण उपोषण केले होते. शहरातील डम्पिंग केंव्हा हटविणार? कुठे स्थलांतरित करणार? आज त्या जागेची काय स्थिती? असे प्रश्न विचारले होते. महापालिकेचे सहायक सार्वजनिक अधिकारी मनीष हिवरे यांनी उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर यांचा वालवली गाव हद्दीत ८ एकर जागेत संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा राहत असल्याचे सांगितले. घनकचरा प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२५ नंतर पूर्ण झाल्यावर त्याजागी शहरातील डम्पिंग स्थलांतरित करणार असल्याचे लेखी उत्तर उपोषणकर्ते काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांना दिल्यावर साळवे यांनी उपोषण मागे घेतले.
महापालिकेच्या लेखी उत्तराने शहरातील खडी खदान येथील डम्पिंग सन-२०२५ नंतर हटणार असल्याचे उघड झाले. त्यामुळे कमीतकमी दीड वर्ष खडी खदान परिसरातील २० हजार पेक्षा जास्त नागरिकांना डम्पिंगचा त्रास सहन करावा लागणार आहे. डम्पिंगला हिवाळा व उन्हाळ्यात आग लागत असल्याने, परिसरात धुराचे साम्राज्य असते. तर पावसाळ्यात परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी यापूर्वी डम्पिंग हटावसाठी रस्ता रोखो, धरणे आंदोलन, उपोषण, महापालिकेत ठिय्या आंदोलन केले आहे. मात्र महापालिकेच्या उत्तराने डम्पिंगचा फास दीड वर्ष कायम राहणार असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करून दीड वर्ष मरणयातना सहन करायच्या का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.