कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरे स्मार्ट करण्यासाठी ६,५०० कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान भाजपाच्या विकास परिषदेत केली होती. नंतर, मात्र त्यांनी त्या निर्णयावर कोलांटउडी घेत ती माझी घोषणा नव्हती, तर तो पालिकेचाच आराखडा होता, अशी भूमिका घेतली. पालिकेने मात्र आपल्या अर्थसंकल्पात स्मार्ट सिटीसाठी अवघ्या २५० कोटींची तरतूद करत त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि मुख्यमंत्र्यांकडून स्मार्ट सिटीसाठी निधीच मिळालेला नाही, असे माहिती अधिकारात उघड करत या घोषणेतील फोलपणा उघड केला.हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी ती माझी घोषणा नव्हती, तर ते पालिकेचे नियोजन होते, असे सांगत सर्व जबाबदारी पालिकेवर ढकलली होती. त्यानंतर, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या ६,५०० कोटींच्या निधीपैकी काही सरकारकडून प्राप्त झाला का, त्याचे नियोजन कसे असेल, अशी माहिती विचारली. त्यावर महापालिकेचे माहिती अधिकारी विनय कुलकर्णी यांनी सरकारकडून अद्याप कोणताही निधी प्राप्त झालेला नसल्याचे उत्तर दिले आहे.मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीवेळी कल्याण-डोंबिवली स्मार्ट आणि सेफ सिटी करण्यासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन देत सहा हजार ५०० कोटींचा आराखडाच जाहीर केला होता. त्यांच्या घोेषणेमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. पण, तेव्हाही त्यांनी ते पालिकेचे स्मार्ट सिटीचे नियोजन असल्याचे स्पष्ट केल्याने आयोगाने मुख्यमंत्र्यांना क्लीन चिट दिली होती. नंतर, सभागृहातही त्यांनी स्मार्ट सिटीच्या घोषणेवर घूमजाव केल्याने विरोधकांनी टीका करत ती भाजपाची निवडणूक प्रचाराची खेळी असल्याचे म्हटले होते. त्यांच्या कोलांटउडीला माहिती अधिकाराच्या तपशिलाने दुजोरा दिला आहे. स्मार्ट सिटीचा आराखडा पालिकेने ज्या वेळी केंद्र सरकारला सादर केला, तेव्हाही तो ६,५०० कोटींचा नव्हता, तर १,४४५ कोटींचा होता. त्यामुळे त्याच वेळी स्मार्ट सिटीचे आश्वासन हा भाजपाचा निवडणूक प्रचाराचा भाग होता, अशी टीका विरोधी पक्षांनी केली होती. महापालिकेने स्मार्ट सिटीचा 1,445 कोटींचा प्रकल्प अहवाल सरकारला सादर केला. पण, पहिल्या यादीत कल्याण-डोंबिवलीचा समावेश झाला नाही. आता दुसऱ्या यादीची प्रतीक्षा महापालिकेसह राजकीय मंडळींना आहे. विशेषत: भाजपाच्या नेत्यांना दुसऱ्या यादीत कल्याण-डोंबिवलीचा समावेश स्मार्ट सिटीत नक्की होईल, असा विश्वास आहे. तोवर भाजपाचे सदस्य आणि स्थायी समितीचे सभापती संदीप गायकर यांनी मात्र स्मार्ट सिटीसाठी 250 कोटींची तरतूदही अर्थसंकल्पात केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कोलांटीवर महापालिकेचे शिक्कामोर्तब
By admin | Published: March 17, 2016 2:52 AM